पणजी रोटरी मिड-टाऊनची योजना
प्रतिनिधी / पणजी
प्रत्येक व्यक्ती ही आपल्या प्रियजनांसाठी प्राणप्रीय असते. परंतु सध्या कोरोनाच्या कहरात अनेकांनी आपले लाडके प्रियजन हरवलेले आहेत. कित्येकजण प्राणांसाठी अखेरची झूंज देत आहेत. मात्र राज्यात सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे कित्येकांना प्राण गमवावे लागत आहेत. अशा परिस्थितीत अनेक संस्था आता त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत.
रोटरी क्लब ऑफ पणजी मिड-टाऊन ही अशीच एक समाजसेवी संस्था. या संस्थेचे सदस्य कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. कोरोनाबाधित कोणत्याही रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होऊ नये या माणुसकीच्या भावनेतून त्यांनी आता गरजवंतांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. एखाद्याच्या प्रियजनास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची आवश्यकता भासत असल्यास रोटरी पणजी मिड-टाऊनतर्फे तो उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी यतीन पारेख 9822101900, किंवा राजीव शिरोडकर 9822136032 यांच्याशी संपर्क करावा, असे मिड-टाऊनतर्फे कळविण्यात आले आहे.









