कोरोनाचा प्रसार चीनमधून सुरू होऊन सर्व जगभर होत आहे. सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येकाच्या मनात एक अनामिक भीती आहे. कदाचित आपणही या रोगाचे शिकार होऊ का? असा प्रश्न निर्माण होतोय, या परिस्थितीत सोशल मीडिया भीती अधिक वाढवण्यावर भर देत आहे. ‘अफवा पसरवल्या तर कारवाई करू’ असा इशारा प्रशासनाने दिला असतानाही वेगवेगळय़ा पोस्ट नागरिकांची धाकधूक वाढवत आहेत. अशावेळी गरज आहे ती मनातील भीती दूर करून प्रतिकारशक्ती वाढवून घेण्याची. कोरोनाकडे गांभीर्याने पाहायला हवेच, तरीही घाबरून न जाता हसत खेळत या समस्येला तोंड देण्याची वेळ आज आली आहे.
बेजबाबदारपणे खोकणे, शिंकणे या रोगाच्या संसर्गाला कारणीभूत ठरू शकते. यामुळे आपल्यापासून इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावीच लागेल. पण सध्या नाक ओढणाऱया, खोकणाऱया आणि शिंक येणाऱया प्रत्येकाकडेच आपण तो कोरोना ग्रस्त असल्यासारख्या नजरेने तर पाहात नाही ना? याचाही विचार व्हायला हवा. ऋतू बदलला, हिवाळा जाऊन उन्हाळा आला. अशा वातावरणात दरवषीप्रमाणे नागरिकांना सर्दी पडसे होणे, ताप येणे स्वाभाविक आहे. पण काही झाले की लगेच हादरून जाऊन आपण रोगग्रस्त झाल्याची मानसिकता निर्माण होऊ न देणे ही खरी गरज आहे.
कोरोना झाला की माणूस मरतो असा एक समज सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरला आहे. अनेकजण डॉक्टर होत आहेत. तर वेगवेगळय़ा औषध पद्धतींचे डॉक्टर वेगवेगळी औषधे सांगत आहेत. मांसाहारी पदार्थांबद्दल अनेक गैरसमज पसरविण्यात आले आहेत. चिकन विपेत्यांना आणि पोल्ट्री फार्म चालविणाऱयांना तर जिणे मुष्कील झाले आहे. अशा स्थितीत गैरसमज दूर करून नागरिक योग्य पद्धतीने या समस्येला तोंड देतील, अशी व्यवस्था करावी लागणार आहे.
माणूस हा प्रत्यक्ष शारीरिक विकारांपेक्षा मानसिक विकारांचा अधिक गुलाम बनलेला असतो. काहीतरी ऐकले की ते आपल्याला होईल की काय, या भीतीने माणूस ग्रासला जातो. आपण मनात एखादा विचार सुरू केला की दडपण येते आणि त्यातून फुकटची धास्ती वाढत जाते. विचारांच्या जंजाळात अडकलेल्या माणसाची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी त्याचे गैरसमज दूर करण्याची गरज असते मात्र याच काळात जर त्याची भीती जास्त वाढत जाईल, अशी कृत्ये झाली तर विपरीत परिणाम होऊ शकतात याचाही योग्य विचार होण्याची गरज आहे.
आम्हा भारतीयांची प्रतिकारशक्ती जास्त आहे. यामुळे आपण कोणत्याही विषाणूंना जोरदारपणे टक्कर देऊ शकतो. ही प्रतिकारशक्ती जागृत ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल ते प्रत्येकाने नक्कीच करावे. स्वच्छता, हायजीन, डॉक्टरांच्या साहाय्याने योग्य उपचार, शरीरात कमतरता असेल तर ती वाढविण्यासाठी प्रयत्न आदी गोष्टी आल्याच. याचबरोबरीने भान बाळगावे लागेल, सामाजिक स्वास्थ्य सुरक्षित राहील याचे. सामाजिक माध्यमांवर कोरोनाबद्दल योग्य तेच घालून नको ते टाळल्यास नक्कीच मदत होईल.









