सर्व ठिकाणी गणपतीच्या आगमनाची तयारी जोमाने सुरू झाली आहे. लवकरच प्रत्येक घराघरातून, गल्लीबोळातून गणपतीच्या आरत्या मोठय़ा उत्साहाने गायिल्या जातील. अनेक पिढय़ा चालत आलेली ही परंपरा पुढे त्याच उत्साहात चालू ठेवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतील. पण जसेजसे दिवस-वर्षे जात आहेत तसतसे या उत्सवातील आध्यात्मिक गांभीर्य कमी होत असून केवळ एक बाह्यदृष्टीने देखावा तेवढाच वाढत चाललेला आहे. हा गणेशोत्सव गणपतीच्या प्रसन्नतेसाठी करण्याचा प्रयत्न सोडून देऊन केवळ स्वतःचे मनोरंजन करण्याकडे कल वाढत चाललेला दिसून येतो. कर्णकर्कश ध्वनिप्रक्षेपण, गणपतीशी कसलाही संबंध नसलेले सिनेसंगीत, हिडीस अंगविक्षेप करीत नशेच्या आहारी जाऊन केले जाणारे नृत्य यांनी या पवित्र गणेशोत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त होत चालले आहे. संस्कृती जपण्याच्या नावाखाली असंस्कृत कार्यक्रम करून या उत्सवातील आध्यात्मिक पायाच पूर्णपणे ढासळून जात आहे. याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करावयास हवा.
वास्तविक आध्यात्मिक उत्सव हे आपल्या मनोरंजनासाठी, प्रसन्नतेसाठी नसतात तर आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, मानसिक शांतीसाठी, मनुष्यजीवनाच्या ध्येयाजवळ घेऊन जाण्यासाठी असतात. आजकाल कलियुगाच्या प्रभावामुळे भक्ती याचा अर्थ देवाकडे काहीतरी मागणे, आपली इच्छापूर्ती करण्यासाठी स्वतःच्या मानसिकतेनुसार विविध देवतांची उपासना करणे समजला जातो. पण आपण ज्या आरत्या म्हणतो त्याचा गंभीरपणे विचार केल्यास आपल्याला ध्यानात येईल की गणपती काय केल्याने प्रसन्न होतील आणि आपण त्यांच्याकडे काय प्रार्थना करीत आहोत. साधारणपणे गणपतीची आरती म्हणताना प्रामुख्याने गणपती, दुर्गा व शंकर यांची आरतीच्या रूपात स्तुती केली जाते. त्यानंतर ‘कायेन वाचा’ श्लोक म्हटला जातो व शेवटी ‘हरे राम हरे कृष्ण’ मंत्राने सांगता होते. ह्या आरत्या केवळ म्हणण्यासाठी नसून त्याचा अर्थ समजावून घेऊन जीवनात गंभीरपणे पालन करण्यासाठी आहेत. पूर्ण आरत्यांचा जागेअभावी उल्लेख करता येत नसल्याने केवळ महत्त्वाच्या भागाचा आपण विचार करू.
सर्वप्रथम गणपतीची आरती म्हणताना गणपतीच्या स्तुतीबरोबर आपण म्हणतो ‘सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची’ याचा अर्थ आहे सुख देणारा, दुःख हरण करणारा, त्याचबरोबर आपल्या जीवनातील विघ्नाची सूचना देणारा. त्यानंतर आपण म्हणतो ‘संकटी पावावे निर्वाणी रक्षावे’ अर्थात निर्वाण म्हणजे मृत्यूच्या संकटातून माझे रक्षण कर. यावरून समजते किती गांभीर्य आहे या आरतीमध्ये. त्याचप्रमाणे दुर्गेची आरती गाताना आपण म्हणतो ‘वारी वारी जन्म मरणा ते वारी । हारी पडलो आता संकट निवारी ।।’ अर्थात पुनः पुन्हा जन्म मरणाच्या संकटातून माझे रक्षण कर आणि नंतर ‘क्लेशापासूनि सोडवी तोडी भवपाशा ।।’ म्हणजे त्रिविध क्लेशापासून मला सोडवून मला भवपाशातून मुक्त कर. तिसरी महत्त्वाची आरती म्हणजे शंकराची, त्यामध्ये वर्णन येते ‘देवीं दैत्यीं सागर मंथन पै केलें ।त्यामाजीं अवचित हलाहल ते उठिलें’ देव आणि दैत्य यांनी जेव्हा समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून अचानक हलाहल नामक विष बाहेर पडले…‘ते त्वासुरपणे प्राशन केले ।नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें’ ते तू देववृत्ती धारण करून प्राशन केल्यानेच तुला नीळकंठ या नावाने प्रसिद्धी मिळाली. शेवटी म्हणतो ‘शतकोटीचें बीज वाचे उच्चारी’ । अर्थात शतकोटी नामांचा जो बीज मंत्र, ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा मंत्र सतत वाचेने उच्चारणारा. या अर्थावरून समजते किती गांभीर्य आहे या आरतीमध्ये. पण दुर्दैवाने आपण केवळ आरतीची चाल, गायन, वाद्य इत्यादींकडे जास्त लक्ष देऊन आरतीचा मूळ उद्देश पूर्णपणे विसरून जातो.
वरील अर्थाचा विस्ताराने विचार केल्यास गणपती आपल्याला मृत्यूच्या संकटाची आठवण करून देतात, दुर्गादेवीही त्याचप्रमाणे पुनः पुन्हा होणाऱया मृत्यूपासून आणि त्रिविध क्लेश म्हणजे आधिभौतिक अर्थात निसर्गापासून होणारे, आधिदैविक म्हणजे इतर जीवापासून होणारे, आध्यात्मिक म्हणजे मन आणि शरीरापासून होणारे त्रास त्याचबरोबर भवपाश म्हणजे जन्म, मृत्यू ,जरा, व्याधीचे प्रत्येक जीवाला असलेले फासरूपी बंधन याची आठवण करून देतात. तात्पर्य काय तर वरील सर्व संकटातून मुक्त होण्यासाठी आपण त्यांच्याकडे प्रार्थना करीत आहोत. तेव्हा या आरत्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा विचार करावयास हवा. सर्व देवता या भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिनिधी रूपाने आपल्याला या सर्व संकटातून मुक्त करू शकतात. जसे शंकराच्या आरतीमध्ये वर्णन येते की विष प्राशन करावयाच्या वेळी त्याच्या कंठामध्ये श्रीराम नाम होते म्हणून विषाचा त्यांच्यावर प्रभाव पडू शकला नाही. त्यासाठी सर्व देवतासुद्धा हरिनामाचा जप करतात आणि आपल्या प्रामाणिक भक्तांनासुद्धा त्या देविदेवतानी ज्याप्रमाणे आपले सर्वस्व भगवान कृष्णाच्या प्रेममयी सेवेमध्ये अर्पण केले त्याप्रमाणे सर्वानी अर्पण करावे यासाठी प्रेरणा देतात.
त्याचे वर्णन पुढील श्लोकामध्ये येते. ‘कायेन वाचा मनसेन्दियैर्वा बुद्ध्यात्मना वानुसृतस्वभावात् । करोति यद यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्’ अर्थात ‘मनुष्याला बद्ध जीवनात विशिष्ट स्वभाव प्राप्त होतो आणि तो आपल्या स्वभावानुसार शरीर, मन, शब्द, इंद्रिये, बुद्धी अथवा विशुद्ध चेतनेने जी जी कार्ये करतो, ती ती सर्व कार्ये त्याने ‘माझ्या कार्यानी श्रीनारायण प्रसन्न होवोत’ अशी प्रार्थना करून ती नारायणांनाच समर्पित करावी. हा श्लोक मूलतः श्रीमद भागवत ग्रंथामधून आहे.
आध्यात्मिक जीवनात केवळ भावनेच्या आहारी न जाता आणि अंधश्रद्धेने स्वतःच्या मनाला येईल त्याला भक्ती न समजता गीताभागवत शास्त्रानुसार आणि ते समजावून सांगणाऱया तुकाराम महाराजांसारख्या शुद्ध वैष्णव भक्तांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या जीवनात पालन केले पाहिजे. स्वतःच्या किंवा ज्याला गीताभागवतचे ज्ञान नाही अशा केवळ बाह्य कर्मकांडावर भर देणाऱया आणि सर्व धार्मिक क्रिया केवळ श्रीनारायणाच्या प्रसन्नतेसाठी आहेत हे न जाणणाऱया तथाकथित धार्मिक व्यक्तीच्या मतानुसार पालन करणे म्हणजे केवळ अंधश्रद्धा आणि मनुष्य जीवनाचा अपव्यय आहे. म्हणून वैदिक शास्त्रानुसार परमेश्वर व ईश्वर यातील संबंध जाणून घेऊन त्याप्रमाणे आध्यात्मिक मार्गाचे पालन केल्यास वर वर्णन केलेल्या संकटांचे निवारण करण्यास गणपती, दुर्गा, शंकर इत्यादी देवता आपणास भगवान श्रीकृष्णाचे प्रतिनिधी म्हणून मदत करतील.
यासाठी तुकाराम महाराज एका अभंगात मार्गदर्शन करताना म्हणतात. अज्ञानी लोक शिव, शक्ती, सूर्य, गणपती आणि विष्णू हे सर्व देव एकच आहेत असे म्हणतात. असे लोक हिरा आणि गार दोन्ही समान मानतात म्हणून यांची भक्ती राजसिक असल्याने वाया जाते. अन्य काही लोक इतर देवतांना परमेश्वर म्हणून तामसिक गुणांमध्ये भक्ती करतात. अशा प्रकारे अन्य देवतांना देवपण देण्याचा हव्यास करून वाया जातात. हे मी माझ्या पदरचे सांगत नाही, माझा धनी श्रीकृष्ण स्वतःच्या मुखाने भगवतगीतेमध्ये हेच सांगतो. जे वैष्णव केशवाची भक्ती करतात ते धन्य आहेत कारण ते सात्विक जीव मोक्षाला योग्य आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, मोक्ष देणारा केवळ गोविंदच आहे अन्य कोणी देवता नाही म्हणून एका गोविंदालाच शरण जा. हा भाव आरती करताना लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणून आरतीच्या शेवटी ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।। या महामंत्राचे कीर्तन करून आरतीची सांगता होते. हा मंत्र केवळ आरतीच्या वेळेला म्हणण्यासाठी नसून तो नित्यनियमाने दररोज जपण्यासाठी आहे.
– वृंदावनदास








