प्रतिनिधी / गडहिंग्लज
पावसाळय़ात झालेल्या जोराच्या अतिवृष्टीमुळे आलेल्या हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी या नद्यांच्या पूरामुळे शेतीचे, पिकाचे आणि घरांची पडझड झाल्याने अडचणीत आलेल्या कुटूबांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी दुपारी गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर घटप्रभा खोरे पूरग्रस्त पुनर्वसन संघर्ष समितीने धरणे आंदोलन केले. अखेर प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पुनर्वसन संघर्ष समितीचे कॉ. संपत देसाई, मनोहर दावणे, प्रशांत देसाई, रमजान अत्तार, विद्या हेळवी आदींच्या नेतृत्वाखाली शहरातील लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा शहरात फिरुन प्रांत कार्यालयावर आल्यावर याठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी मनोहर दावणे, रमजान अत्तार, विद्या हेळवी यांनी मार्गदर्शन केले. कॉ. संपत देसाई यांनी शासनावर टिका करत पूरग्रस्त अजुनही मदतीपासून वंचित आहेत. पूरग्रस्तांची कळवळ अधिकाऱयांना दिसत नाही. याबद्दल खंत व्यक्त केली. त्यानंतर प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीत पूरग्रस्त गावांचा गावनिहाय पुनर्वसन आराखडा करावा. प्रत्येक गावातील पूरग्रस्त कुटूंबांची यादी तयार करावी. यादीचे गाववार वाचन करावे.
अतिवृष्टी आणि पूरबाधीत कुटूंबांना त्यांच्या नुकसानीचा योग्य मोबदला तातडीने मिळावा. आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार आपत्ती प्रतिबंधक उपाय योजना तयार कराव्यात. गडहिंग्लज विभागातील नद्यांवरील धरणांचा विसर्ग आणि लगतच्या कर्नाटक हद्दीतील धरणाचा विसर्ग यात समन्वय साधण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील पाटबंधारे अधिकाऱयांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी बैठक घ्यावी. यावर चर्चा झाली. या चर्चेत कॉ. देसाई यांच्यासह रमजान अत्तार, प्रशांत देसाई, मनोहर दावणे, रेखा लोहार, विद्या हेवाळे, प्रकाश मगदूम, नंदा रेगडे, वसंत नाईक आदींनी भाग घेतला. चर्चेनंतर सुमारे दोन तास सुरु असणारे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. चर्चेप्रमाणे कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील पूरग्रस्त नागरीक, महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.