गडहिंग्लज/प्रतिनिधी
आफ्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान 12 संचालकांनी शुक्रवारी दुपारी प्रादेशिक सहसंचालक (साखर) एस. एन. जाधव यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे सादर केले आहे. राजीनामा सादर केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असून राजीनामे देणाऱया संचालकात डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, सतिश पाटील, विद्याधर गुरबे, दिपक जाधव, प्रकाश पताडे, अनंत कुलकर्णी, सुभाष शिंदे, सदानंद हत्तरकी, किरण पाटील, जयश्री पाटील, क्रांतीदेवी कुराडे यांचा समावेश आहे.
दरम्यान, चेअरमन हे मनमानी कारभार करत असून संचालक मंडळास विश्वासात न घेता संचालक मंडळाची रितसर सभा न बोलवता साखर विक्रीची टेंडर मागविले आहे. चेअरमन यांच्या मनमानी कारभारास कंटाळून संचालक पदाचा राजीनामा देत असल्याचे या 12 संचालकांनी संयुक्त पत्रकात म्हटले आहे. 22 जानेवारीला होणारी साखर विक्री थांबवावी अशी मागणी ही केली आहे.