उचगांव / वार्ताहर
गडमुडशिंगीसह उंचगाव, वसगडे, सांगवडे, सरनोबतवाडीसह करवीर पूर्वभागातील सर्व गावातील वाढीव विज बिलाबाबत करवीर शिवसेनेच्यावतीने वीज वितरण कार्यालयाला वाढीव वीज बिलाचे तोरण बांधले. या आंदोलनात गडमुडशिंगीतील किराणा माल दुकानदार व्यापारी संघटनाही सहभागी झाली. आंदोलनाचे नेतृत्व तालुका उपप्रमुख पोपट दांगट यांनी केले.
मार्च ते जून व आजअखेर देश व राज्यभर कोरोना महारोगामुळे व लॉक डाऊन मुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. उद्योजक व सर्व सामान्य नागरिक, शेतकरी वर्ग आर्थिक टंचाईमुळे त्रस्त आहे. अशातच नागरिकांना वाढीव वीज बिले देण्यात आली आहेत. त्यामुळे सर्वामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोजगार बुडाला, खायला पण काही नाही. विजेचे बिले मात्र भरमसाठ रिडींग न घेताच अली आहेत. ग्राहकांच्या रोषामुळे तुम्ही आता म्हणता टप्याटप्याने भरा, पण एवढी मोठी वाढून आलेली बिले भरणार तरी कुठून, असा सवाल तालुकाप्रमुख राजू यादव व पोपट दांगट यांनी केला.या वेळी विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले.
दरम्यान, उपकार्यकारी अभियंता रामेश्वर कसबे यांनी ग्राहकांच्या शंकेचे निरसन करण्यात येईल. प्रत्येक गावातील कार्यालयातच संबंधित ग्राहकांच्या बिलाची दुरुस्ती करून देऊ व तोपर्यंत कोणाचेही वीज कनेक्शन कट करणार नसल्याचे सांगितले. राजू यादव, पोपट दांगट, संदीप दळवी, विक्रम चौगुले, दीपक रेडेकर, संतोष चौगुले, बाबुराव पाटील, शिवाजी गिरूले, वीरेंद्र भोपळे, गुंडा वायदंडे, नागेश शिरवटे, प्रफुल्ल घोरपडे, बाळासाहेब नलवडे, संतोष बाफळे, उत्तम पाटील, उमेश वडगावकर, संदीप शिरगावे, पांडुरंग माळी, सूर्याजी माने आदी शिवसैनिकांनी आंदोलनात सहभाग दिला. गडमुडशिंगी शाखा अभियंता महेश मुदाळे व उंचगावचे शाखा अभियंता रघुनाथ लाड आंदोलनस्थळी उपस्थित राहिले.
Previous Articleकुरुंदवाड शहरात सापडले दोन कोरोना पॉझिटिव्ह
Next Article एक वारी अशीही








