आलिया भट्ट लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतीक्षित गंगूबाई काठियावाडी चित्रपटात दिसून येणार आहे. भन्साळी यांनी स्वतःच्या जन्मदिनी चित्रपटाचा टीजर प्रदर्शित केला होता. पण कोरोना संकटामुळे चित्रपटासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
20 जूनपासून आलिया या चित्रपटाच्या चित्रिकरणात सामील होणार असल्याचे समजते. दोन दिवसांच्या चित्रिकरणानंतर आलियाचे काम पूर्ण होणार आहे. आलिया आणि भन्साळी कोरोनाबाधित झाल्यावर चित्रिकरण रोखण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने लॉकडाउन लागू केला होता. याचा प्रभाव चित्रिकरणाच्या सेटवरही पडला होता. पण सरकारने आता चित्रिकरणाला अनुमती दिल्याने भन्साळी वेळ वाया घालविण्याच्या मूडमध्ये नाहीत.
आलिया स्वतःचा दुसरा चित्रपट एसएस राजामौली यांच्या आरआरआरचे चित्रिकरणही 1 जुलैपासून सुरू करणार आहे. आलियाने या चित्रपटासाठी दोन आठवडय़ांचा वेळ राखून ठेवला आहे. या चित्रपटात आलिया, राम चरण, एनटी रामा राव ज्युनियर आणि अजय देवगणही काम करत आहे.









