वृत्तसंस्था/ मँचेस्टर
प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर युनायटेड संघाकडून खेळणारा पोर्तुगालचा अव्वल स्ट्रायकर ख्रिस्टियानो रोनाल्डोने गुरुवारी झालेल्या सामन्यात आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकीर्दीतील 800 व्या गोलाची नोंद केली. रोनाल्डोच्या शानदार कामगिरीच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने या सामन्यात अर्सेनलचा 3-2 असा पराभव केला. या विजयामुळे मँचेस्टर युनायटेडने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविले आहे.
ओल्डट्रफोर्ड मैदानावर झालेल्या या सामन्यात इमेली स्मिथ रोवेने अर्सेनलचे खाते उघडले. रोवेच्या या फटक्मयावर मँचेस्टर युनायटेडचा गोलरक्षक जखमी झाला. बुनो फर्नांडिसने गोल नोंदवून मँचेस्टर युनायटेडला बरोबरी साधून दिली. त्यानंतर रोनाल्डोने गोल नोंदवून पुन्हा मँचेस्टर युनायटेडला आघाडीवर नेले. रोनाल्डोच्या वैयक्तिक फुटबॉल कारकीर्दीतील हा 800 वा गोल ठरला. मार्टिन ओडेगार्दने अर्सेनलचा दुसरा गोल केला. पाचवेळेला बॅलन डीओर पुरस्कार मिळविणाऱया पोर्तुगालच्या रोनाल्डोने सामना संपण्यास 20 मिनिटे बाकी असताना पेनल्टीवर मँचेस्टर युनायटेडचा तिसरा आणि निर्णायक गोल करून अर्सेनलचे आव्हान संपुष्टात आणले. रोनाल्डोने यापूर्वी रियल माद्रिद संघाकडून खेळताना 450 गोल, युवेंटस संघाकडून खेळताना 101 गोल नेंदविले आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रात पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करताना रोनाल्डोने आतापर्यंत 115 गोल नोंदविले आहेत.









