येत्या काही दिवसांत उद्घाटन, 24 लाख खर्च : सरपंच पूर्णा नायक यांनी दिलेली माहिती
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण तालुक्यातील खोल पंचायतीने 14 व्या वित्त आयोगाच्या आर्थिक साहाय्याने बांधायला घेतलेल्या कचरा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आलेले असून येणाऱया काही दिवसांत हा प्रकल्प पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती खोलच्या सरपंच पूर्णा नायक यांनी दिली आहे. या कचरा प्रकल्पाच्या कामावर 24 लाख रु. इतका खर्च करण्यात आलेला आहे.
खोल पंचायत कार्यालयानजीक पंचायतीच्या मालकीच्या जमिनीवरच हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. गावात एखादा चांगला प्रकल्प आणायचा झाल्यास काही व्यक्ती केवळ विरोध करण्यासाठीच ग्रामसभेत उपस्थित राहत असतात. मात्र ज्यांना गावचा विकास व्हावा असे वाटते त्या व्यक्ती ग्रामसभेला उपस्थित राहून विधायक प्रकल्पांना पाठिंबा द्यायला पुढे येत नसतात. त्यामुळे या पंचायतीमधील बरेच प्रकल्प रखडले आहेत, असे मत सरपंच नायक यांनी यावेळी व्यक्त केले.
सध्या खोल पंचायत गावागावात जाऊन ओला आणि सुका कचरा गोळा करण्यग्नाचे काम करत आहे. त्यासाठी दोन व्यक्तींची नेमणूक करण्यात आलेली आहे. गोळा केलेल्या कचऱयाचे विलगीकरण करून यापुढे सुक्या कचऱयावर याच ठिकाणी प्रक्रिया करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर खास तरतूद करण्यात आली आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 24 लाख रु. खर्च करून 7 नवीन खोल्या तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या खोल्या व्यावसायिकांना भाडेपट्टीवर देण्यात येणार असून त्यामुळे पंचायतीच्या महसुलात वाढ होणार आहे. त्यानंतर आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या या पंचायतीची आर्थिक घडी बऱयापैकी सुधारणार, असे मत सरपंचांनी व्यक्त केले.
या पंचायतीच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण करण्याचा निर्णय पंचायत मंडळाने घेतला आहे. नव्याने उभ्या राहिलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या समोर महिलांच्या स्वयंसाहाय्य गटाकडून हॉटेल चालविण्यात येत असून या गटाला पंचायतीच्या जुन्या इमारतीमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सरपंच नायक यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या कारकिर्दीत खोल पंचायतीचा आर्थिक स्तर उंचावतानाच गावात सरकारच्या विविध योजना, सुविधा देण्याचा प्रयत्न झालेला असून याकामी माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









