वार्ताहर / खोची
खोची ता. हातकणंगले ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी ग्रामस्थांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र नेतेमंडळी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यास खो बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परंतु काही नेत्यांकडून बिनविरोध निवडणुकीसाठी प्रतिसाद दिला जात नसल्याने निवडणूक लागणार की बिनविरोध होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
बुधवार पासून अर्ज भरण्यास सुरवात झाली असून नेतेमंडळींनी यापूर्वीच आरक्षित उमेदवारांचे दाखले गोळा करण्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीला पुर्णविराम बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्य परिस्थितीला तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणूक लागल्यास मोठी चुरस निर्माण होणार आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी ग्रामस्थांकडून खास करून तरुण वर्गाकडून सोशल मीडियातून पाठिंबा दिला जात आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यास होणारा खर्च वाचून गाव विकासाची कामे करता येतील असे बोलले जात आहे.
नेतेमंडळी मात्र बिनविरोध निवडणूकीसाठी बैठक घेण्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणूक बिनविरोध झाल्यास गावास आमदार राजूबाबा आवळे व जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव यांच्या फंडातून चाळीस लाख रूपये विकासकामांसाठी दिले जाणार आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी. यासाठी तरूण वर्गाकडून सोशल मीडियावर पाठिंबा व्यक्त करून सर्व गटांनी एकत्र यावे यासाठी आवाहन केले जात आहे. परंपरागत दोन गट असून यावेळी तिसरा गट सक्रिय झाल्याने बिनविरोध निवडणूकीला खो बसणार असे चित्र निर्माण झाले आहे.ग्रामस्थ बिनविरोध निवडणूकीवर ठाम असून नेतेमंडळींच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.
गावात शांतता राहून विकास पर्वाची नांदी सुरू होण्यासाठी चालू सन २०२१ ची खोची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी खोची परिसर पत्रकार संघाच्या वतीने दोन लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. हे बक्षीस शालन पंडित पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक लाख सुमनताई राजाराम पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक लाख व श्रीमती सुशीला कृष्णात गायकवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५१ हजार असे एकूण दोन लाख ५१ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तरी खोची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावे.असे आवाहन करण्यात आले आहे.