सातारा : राज्यातील खेळाडूंनी खेळावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. राज्य शासन सर्व खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्यात उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी दिली.
सरडे, ता. फलटण येथे तिरंदाज प्रवीण जाधव याच्या घरी क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी भेट देऊन प्रवीण जाधव यांचा सन्मान व सत्कार केला, त्या वेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक आदी उपस्थित होते.
केदार म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यामधील सरडे या छोट्या गावामधून प्रवीण जाधव यांनी स्वतःचे कला कौशल्य ओळखून क्रीडा प्रबोधिनीमध्ये जाऊन तिरंदाजी बाबतचे शिक्षण घेतले. तालुक्याचे व राज्याचे नाव उंचावेल अशी टोकियो येथील ऑलिम्पिकमध्ये कामगिरी बजावली. या वेळेस नाही परंतु पुढच्या वेळेस प्रवीण हा देशासाठी व राज्यासाठी नक्कीच गोल्ड मेडल जिंकेल, असा विश्वासही क्रीडामंत्री केदार यांनी यावेळी व्यक्त केला.
क्रीडामंत्री म्हणून काम करत असताना या विभागाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन हा पूर्णतः वेगळा आहे. राज्यांमध्ये विविध खेळांमध्ये खेळाडू निर्माण झाले पाहिजेत. खेळाडू म्हणून खेळत असताना प्रत्येक जण उतरल्यानंतर प्रत्येकालाच मेडेल मिळेलच असे नाही. परंतु खेळाडूंनी आपले सर्वस्व पणाला लावून खेळले पाहिजे. खेळाडूंसाठी पुणे येथील बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे. यावर्षी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना मी आपल्या देशासाठी व राज्यासाठी पदक आणू शकलो नाही, परंतु आगामी होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये मी नक्कीच पदक आणि त्या व त्यासाठीच मी कार्यरत राहीन, अशी ग्वाही यावेळी तिरंदाज प्रवीण जाधव यांनी सर्वांना दिली.









