टॉयकैथॉन-2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन : विद्यार्थ्यांकडून निर्मित गेम्सचे कौतुक
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टॉयकैथॉन-2021 मध्ये सामील स्पर्धकांशी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला आहे. यादरम्यान सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्वतःच्या गेम्सविषयी पंतप्रधानांना माहिती दिली. यादरम्यान पंतप्रधानांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या गेम्सबद्दल सूचना केल्या आहेत. ज्याप्रकारे मुलांची पहिली पाठशाळा कुटुंब असते, तसेच त्यांचे पहिले पुस्तक आणि सवंगडी खेळणी असतात, असे प्रतिपादन मोदींनी यावेळी केले आहे.
मोदींनी खेळण्यांच्या बाजारावरूनही चर्चा केली आहे. खेळण्यांचा बाजार जगभरात 100 अब्ज डॉलर्सचा आहे. यात भारताची भागीदारी 1.5 अब्ज डॉलर्सची आहे. ही स्थिती बदलण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
सर्वप्रथम केसीजी कॉलेजच्या टीमने पंतप्रधानांनी स्वतःच्या ऍपविषयी माहिती दिली. या टीमने गेमिंगद्वारे योगचा प्रचार-प्रसार करण्याची पद्धत शोधून काढली आहे. या टीमने तंत्रज्ञान आणि परंपरेचा मिलाप केला असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
हेरिटेज रेस
कोइम्बतूर येथून आलेल्या टीमच्या सदस्यांनी ‘हेरिटेज रेस’ नावाच्या गेमचे सादरीकरण केले. यात सायकलिंग आणि व्हर्च्युअल साइट सीनला जोडण्यात आले होते. या गेमची निर्मिती करणाऱया अतीकला पंतप्रधानांनी ही कल्पना कशी सुचली विचारणा केली. टॉयकैथॉनमुळे ही कल्पना सुचल्याचे उत्तर अतीकने दिले आहे. व्हर्च्युअल टूरचा गेम खूपच चांगला आहे. या गेमला ट्रेडमील, स्मार्टवॉचशी जोडण्यावरही काम केले जावे, अशी सूचना मोदींनी त्याला केली आहे.
जाम्याहम
तिसरी टीम उत्तरप्रदेशातील विद्यार्थ्यांची होती आणि त्यांनी केमिस्ट्री बोर्ड गेम तयार केला होता. विद्यार्थ्यांना केमिस्टी समजून घेताना अडचणी येऊ नयेत असा उद्देश बाळगून त्यांनी ‘जाम्याहम’ नावाचा गेम तयार केला आहे. या गेमची संकल्पना संस्कृतमधून प्राप्त झाल्याचे विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना सांगितले आहे. पंतप्रधानांनी या गेममध्ये मॅप फॅक्टरवर काम करण्याची सूचना केली आहे.
शिक्षणमंत्र्यांची उपस्थिती
या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक देखील उपस्थित होते. टॉयकैथॉनचे आयोजन शिक्षण मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय, वस्त्राsद्योग मंत्रालय, माहिती-प्रसारण मंत्रालय आणि एआयसीटीईकडून करण्यात आले आहे.
भारतात मोठी बाजारपेठ टॉयकैथॉन-2021 मध्ये देशभरातून 1.2 लाख स्पर्धकांनी 17 हजारांहून अधिक संकल्पनांची नोंदणी आणि सादरीकरण केले आहे. यातील 1567 संकल्पनांना ऑनलाईन टॉयकैथान ग्रँड फिनालेसाठी निवडण्यात आले आहे. यातील विजेत्याला 60 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. याच्या विजेत्याची घोषणा 26 जून रोजी होईल. भारतात खेळण्यांची बाजारपेठ 150 कोटी डॉलर्सची आहे. यातील बहुतांश हिस्सा विदेशातून आयात करण्यात येतो.









