वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी ऑलिंपिक क्रीडास्पर्धेसाठी नवोदित गुणवत्ता असलेल्या खेळाडूंना प्राधान्य देण्याच्या हेतूने ‘खेलो इंडियाच्या’ विविध राज्यांतील सहा केंद्राना बढती देण्यासाठी क्रीडा मंत्रालयाकडून चार वर्षांच्या कालावधीसाठी 67.32 कोटी रूपयांच्या आर्थिक मदतीला अधिकृत मान्यता शनिवारी देण्यात आली.
देशातील ‘खेलो इंडियाच्या’ सहा विविध राज्यातील असलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स (केआयएससीई) केंद्रांमधील यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सहा सुविधांना बढती देण्याचा निर्णय क्रीडा मंत्रालयाने घेतला आहे. गौहत्ती, सेरूसेजाई येथील स्पोर्टस् अकादमीला 7.96 कोटी रूपये, शिलाँगमधील जेएनएस कॉम्प्लेक्सला 8.39 कोटी रूपये, गंगटोकच्या पालझर स्टेडियमला 7.91 कोटी रूपये, सिलवासाच्या न्यू स्पोर्टस् कॉम्प्लेक्सला 8.05 कोटी रूपये, मध्यप्रदेश स्टेट अकादमीला 19 कोटी रूपये, पुणे बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाला 16 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. 2020-21 च्या आर्थिक वर्षांमध्ये क्रीडा मंत्रालयातर्फे एकूण 67.32 कोटी रूपयांची तरतूद चार वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
भविष्यकाळात ऑलिंपिक स्पर्धेत भारताची कामगिरी दर्जेदार होण्याकरिता आतापासूनच शासनाने प्रयत्न सुरू केले असून 2028 च्या ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळविणाऱया देशांच्या यादीमध्ये भारत पहिल्या 10 क्रमांकामध्ये येण्याकरिता विविध योजना अंमलात आणल्या जाणार नसल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजु यांनी दिली. खेळाडूंसाठी या विविध केदांमध्ये प्रशिक्षण सरावा करिता आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.









