वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा भालाफेकपटू निरज चोप्राची भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनतर्फे प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्कारांसाठी तर महिला धावपटू दुती चंद हिची ओडिशा शासनातर्फे अर्जुन पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आली आहे.
22 वर्षीय चोप्राची या पुरस्कारांसाठी सलग दुसऱयांदा अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने शिफारस केली आहे. 2018 साली ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत चोप्राने पुरूषांच्या भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळविले होते. या कामगिरीबद्दल त्याचा 2018 साली भारतीय शासनातर्फे अर्जुन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. निरज चोप्राने गेल्या जानेवारीत दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेत 87.86 मी. भालाफेक करत टोकियो ऑलिंपिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. भारताची 2019 साली दुती चंदने विश्व विद्यापीठ क्रीडास्पर्धेत सुवर्णपदक तर 2018 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत हिने दोन रौप्यपदके मिळविली होती.









