सलामीलाच अहाहा वसूल व्हावी असे जीवघेणे आणि ताकदवान स्वरबंध. सोहनी सारखा वातावरणाला आणि सृष्टीच्या सृजनाच्या सोहळय़ाला अगदी ‘सोहत’ असणारा राग…त्यातली थोडी वेदना, थोडी इशारत खूपशी सूचकता आणि पराकोटीची उलथापालथ दर्शवणारी आर्तता. बाहेर वसंतोत्सवाची धामधूम आणि आतमध्ये मनाला फुटणारे हिरव्या नव्हाळीचे धुमारे. आवरायचं तरी कसं हे सगळं? आणि नाहीच आवरलं तर? राधेला अगदी बाधा होते. आणि मग…
रंग ना डारो शामजी
गोरी पे रंग ना डारो शामजी
अशी आर्त विनवणी सुरांचे सगळे रंग अगदी बेधुंदपणे उधळत येते. बंदिश म्हणजे जणु अगदी मोजक्मया शब्दात मांडलेले कथाबीज. त्या कथेला फुलवायचे ते फक्त त्या त्या रागांच्या स्वरबंधांच्याच चौकटीत राहून. पण त्या चौकटीत मात्र ज्याचा त्याचा स्वतंत्र विचार. ते अवकाश मोकळं. मग पं. कुमार गंधर्वांच्या त्या पेशकारीत श्यामजीचं केव्हा लाडिक जवळीक दर्शवणारं श्याम होतं आणि त्यानंतरचा तो सुरेल विराम इतका काळजाला लागत जातो की काय सांगावं. तशीच मालिनीबाई राजूरकरांनी उधळलेली ती स्वरपुष्पं. बंदिश तीच, पण त्यांचे विचार किती नटवतात तिला! वेगवेगळय़ा गायकांच्या गळय़ातून उतरणारी ती कसले सुरंगी मूड घेऊन येते! केव्हाही ऐकायला मिळो. ती असते रंगोत्सवाची जननी. होळी! याच होळीच्या निमित्ताने एकेक बंदिशी अशा फेर धरतात मनात. तशीच ती ‘बागेश्री’मधली गतिमान डौलदार ‘ना डारो रंग मोपे’ ही पं. प्रभाकर कारेकरांच्या आवाजातली मोहक चीज. तिची सुरुवातच दमदार अवरोही बोलतानेने जी होते ती ऐकणाऱयाला नामोहरमच करून सोडते आणि तिची शब्दकळा किती वेधक! होळी खेळताना तिला रंगानं भिजवून सोडणाऱया प्रियकराला, भिजून हैराण झालेली ती विनवत राहते की,
‘तंग बसन अंग अंग प्रगट होत
ब्रिजवासी देखत सब’….आणि पुढे त्याची खरडपट्टीही काढते की,
कैसी न तोहे लाज आवे
निहरत जोबनवा मोरा
बीच डगर घेर लेत
तरीही तो ऐकतच नसावा आणि तिला भिजवून तिचं अंगांग न्याहाळतच असावा असं वाटतं. कारण पंडितजींनी त्यामध्ये केलेली तानांची बरसातच तशी आहे. इतकी विविधरंगी आहे की ऐकणाराही आतून बाहेरून भिजून जातो. तसंही आपलं राग संगीत हे कृष्णाला वाहिलेलंच आहे जणु. किती त्या राधाकृष्णाच्या प्रेमाचं विरहाचं वर्णन करणाऱया चिजा! मग त्यात होळी आणि रंग तर ठायी ठायी असणारच ना! होळी आणि रंगोत्सव म्हटलं की अभिजात संगीतातील विविध रंगांचा जल्लोष आपल्याला अगदी ओढून घेत राहतो. ‘पहाडी’ असं पहिलवानी नाव असणारा एक राग संगीतामध्ये आहे हे जेव्हा मी पहिल्यांदाच ऐकलं तेव्हा हसूच फुटलं होतं. पण..
होरी खेले कान्हा सखि
रंगी मोरी चुनरी
कैसे जावूँ गारी देगी
सास नणंद मोरी
असे शब्द असलेली एक चीज आरतीताई अंकलीकरांच्या आवाजात मी ऐकली आणि ‘पहाडी’ रेशीम कसं असावं ते कानांना उमगलं जणु. होळीच्या रंगाने रंगलेली तिची चुनरी आणि बिचारीचा जीव घरचे लोक काय म्हणतील? सासू आणि नणंद शिव्या देतील, नावं ठेवतील म्हणून गोळा झालेला. तुला मी शरण आले आहे. हरले मी तुझ्यापुढे असं म्हणत ती हळूच त्याच्याकडे कबुलीही देते की,
प्रीत है पुरानी मोरी
शामरंग रंगी
त्याला हवं ते शेवटी तो कबूल करून घेतोच तिच्याकडून. होरीचा तो आकृतिबंध आरतीताईंनी असा सुंदर रंगवलाय की स्वरांना रंग असतात हे मान्यच करावं लागेल आपल्याला. लोकधूनेपासून जन्माला आलेला असा हा धुनप्रधान राग शास्त्रीय संगीताच्या काहीशा लाइट भागासाठी जास्त करून वापरला जातो अशी माहितीही त्यांनी त्या सादरीकरणाच्या जोडीनं दिली होती. होळीचा असाही एक रंग!
धृपदधमार हा विषय आणि शब्द एकत्रच ऐकलेला. त्यानंतर खूप दिवसांनी समोर आलं की हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. धमार म्हणजे धमाल करण्यासारखा प्रकार आहे अशी समजूत, तो अभ्यासक्रम म्हणून शिकून घ्यायची वेळ आली तेव्हा खरं काय ते स्पष्ट झालं. तोही खास ‘होरी’ अर्थात होळीच्या गीतासाठी खास वापरला जाणारा ताल.
खेलत श्याम होती
मारत पिचकारी
रंग में भीगे सारी
ब्रिज की नर नारी
अशी सुंदर रचना जेव्हा गायिली जाते तेव्हा तिला स्वरबद्ध करणाऱया कलाकाराने किती विचारपूर्वक कलाकुसर केलेली आहे ते शिकता शिकता आमच्यासारख्या साक्षात दगडाच्याही लक्षात येत जातं. ‘अल्हैया बिलावल’ मध्ये मोठय़ा खुबीने योजलेल्या कोमल निषादाचं अगदी नेमकं अस्तित्व अंतऱयातल्या ‘संग राधा दुलारी’ पुरतंच दिसतं. राधा जशी स्पेशल तसाच तो नाजुकसा कोमल निषाद. रंगात भिजलेलं गोकुळ, सप्तरंगांची ती न्यारी शोभा, नंद यशोदा आणि कान्हाची दुलारी राधा. गोकुळातली होळी असतेच तशी! ‘होरी’ हा अभिजात संगीतातील एक स्वतंत्र गानप्रकार आहे. त्यामध्ये अगदी विलंबित ख्याल, द्रुत चिजा, धमार अशा सर्वच प्रकारात होळीची वर्णनं येतात. निमित्त एकच असतं. होळीच्या सणाचं
सेलिब्रेशन. पूर्वी जेव्हा संगीताला जनमानसात तितकीशी प्रति÷ा नव्हती तेव्हाच हे अतिशय रंजक, आकर्षक आणि तत्कालीन लोकजीवनाचं, सणांचं वर्णन मोहक शब्दात करणारे गीतप्रकार जन्माला आले. कितीतरी जुन्या चिजा आजही अतिशय हौसेने गायिल्या जातात आणि नवीन रचनाही केल्या जातात. रंग, रंगोत्सव, राधाकृष्णांचं विशुद्ध प्रेम, सृष्टीच्या निर्मितीचा उत्सव कधीही जुना होत नाही. तो नित्य नवीन असतो. आपलं राग संगीतही तसंच आहे. अनेक बदल पत्करून आणि असंख्य प्रवाह एकारत ते वाहत असतं. प्रत्येक प्रवाहाचा रंग वेगळा असतो आणि जेव्हा ते सगळे एकत्र होतात तेव्हा म्हणावंसं वाटतं,
अवघा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग
अपर्णा परांजपे-प्रभु