प्रतिनिधी/ खेड
अलसुरे येथील दगावलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांना कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. यातील केवळ तिघेजण आयसोलेशनमध्ये निगराणीखाली आहेत. संस्थात्मक विलगीकरण कक्षात देखरेखीखाली असलेल्या व्यक्तींची संख्या 46वर पोहोचली आहे. लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात नव्याने निर्मिती करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात 17जण, आयसीएस महाविद्यालयातील कक्षात 16, तर कळंबणी 13 जण देखरेखीखाली आहेत. दरम्यान, आरोग्य पथकाने सहाव्या दिवशी 4071 घरांचे सर्व्हेक्षण करून 16053 जणांची तपासणी केली.
अलसुरेतील 50 वर्षीय व्यक्तीच्या संपर्कात आलेल्याची संख्या 38वर पोहोचली आहे. यातील 28 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 10 जणांचे अहवाल अजूनही प्रतिक्षेत आहेत. कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात आयसोलेशनमध्ये निगराणीखाली असलेल्या यातील 13जणांना भडगाव-खोंडे येथील आय.सी.एस. महाविद्यालयातील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. बुधवारी यात आणखी तिघांची भर पडली असून ही संख्या 16 झाली आहे.
कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील आयसोलेशनमध्ये मृत व्यक्तीचे आई-वडील व अन्य एकजण आयसोलेशनमध्ये निगराणीखाली आहेत. याच रूग्णालयातील संस्थात्मक विलगीकरण कक्षात 13जण देखरेखीखाली आहेत. आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींना उपचारानंतर क्वारंटाईन करण्यात येते. ही संख्या दिवसागणिक वाढत चालल्याने मंगळवारी लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातही संस्थात्मक विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली असून येथे बुधवारी 17 जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले. परशुराम रूग्णालयातही संस्थात्मक विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. सहजीवन हायस्कूलमधील संस्थात्मक विलगीकरण कक्ष रिकामे झाले आहे. मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा अजूनही शोध सुरूच असून आरोग्य पथकांकडून साऱया शक्यतांची पडताळणी करण्यात येत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. ए. मारकड यांनी मंगळवारी अलसुरे येथे जाऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. येथे कार्यरत असलेल्या आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका, आशा, मदतनीस यांना मार्गदर्शन करत सतर्कतेच्या सूचना दिल्या. तालुका आरोग्य विभागाने पाच गावांसह शहरातील डाकबंगला परिसरात तैनात केलेल्या आरोग्य पथकांनी सहाव्या दिवशी सर्व्हेक्षणाची मोहीम अधिक तीव्र केली. अलसुरे, भोस्ते, कोंडीवली, मोरवंडे, निळीक या पाच गावांतील 1450 घरांचे सर्व्हेक्षण करत 6326 जणांची तपासणी केली. डाकबंगला परिसरात 2621 घरांचे सर्व्हेक्षण करत 9727 नागरिकांची तपासणी केली. मुंबई, पुणे येथून येणाऱया नागरिकांवरही आरोग्य पथकांची करडी नजर आहे.
सर्व्हेक्षणाअंती आणखी एकास होम क्वारंटाईन करण्यात आले असून ही संख्या 311 झाली आहे. दरम्यान, बुधवारी शेरवली येथे मुंबईहून चौघेजण आल्याची माहिती मिळताच आरोग्य पथकांकडून वैद्यकीय तपासणीच्या हालचाली सुरू होत्या. या चौघांनाही होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.









