ऑनलाईन टीम / मुंबई :
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि राज्याच्या माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी काही दिवसांपुर्वी सरकारी कामकाजाचा डेटा लीक करणे त्याचबरोबर काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. त्यानंतर या प्रकरणात रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने समन्स बजावले होते आता याला रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलिसांना उत्तर दिले आहे.
जबाब नोंदवण्यासाठी बुधवार 28 एप्रिल (आज) रोजी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास शुक्लांना समन्समध्ये सांगण्यात आले होते. मात्र,सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रश्मी शुक्ला यांना मुंबईत चौकशीला हजर राहता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असे उत्तर रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलला दिले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलात बदल्या करण्यासाठी अनेक फोन कॉल केले गेले होते, असा आरोप केला होता. त्याचा एक अहवाल त्यांनी वाचून दाखवला होता. तर हे पुरावे त्यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे दिले होते. हे पुरावे रश्मी शुक्ला यांच्याकडून लीक झाल्याचे समोर आले होते. एवढंच नाहीतर रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी कृत्यासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. पण, त्यांनी याचा गैरवापर केला असा आरोप देखील त्यांच्यावर आहे.
दरम्यान, रश्मी शुक्ला सध्या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्तपद देखील त्यांनी भुषवले होते.









