कोल्हापूर प्रतिनिधी
घराच्या भिंतीच्या बांधकामाच्या कारणावरुन खूनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.पाटील यांनी चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.आनंदा तुकाराम पाटील (वय वय 42 रा.परखंदळे ता शाहूवाडी) असे आरोपीचे नाव आहे.
अशोक शामराव रेडेकर (वय 35 रा. थेरगाव ता शाहूवाडी) यांच्या मावशीचे डोणोली येथे घर आहे. त्यांच्या घराच्या भिंतीला लागूनच आरोपी आनंदा पाटील यांचे घर आहे. रेडेकर यांच्या मावशीच्या घराच्या भिंतीच्या बांधकामामुळे पाटील यांच्या घराचा दरवाजा बंद होत नाही, तसेच त्याची दुरुस्ती केली नाही. या कारणावरुन 17 मार्च 2018 रोजी आनंदा पाटील यांने अशोक रेडेकर यांना ठार मारण्याच्या उद्देशाने गळा आवळून लोखंडी घणाने शॉक अब्झॉर्व्हरच्या स्टील पाईपने रेडेकर यांच्या व्हील अलायमेंट दुकानातील मशीनरी फोडून सहा लाखाचे नुकसान केले. यामुळे रेडेकर यांनी आनंदा पाटील याच्याविरोधात शाहूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. शाहूवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पी.एच.यम्मेवार यांनी या गुन्हय़ाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.पाटील यांच्यासमोर हा खटल्याची सुनावणी झाली. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील ए.ए.महाडेश्वर यांनी केलेला युक्तिवाद आणि पाच साक्षीदारांच्या साक्षी ग्राहय मानून न्यायालयाने आरोपी पाटील याला चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि 5 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला. महाडेश्वर यांना ऍड गजानन कोरे, प्रशांत कांबळे,हेड कॉन्स्टेबल एफ.आय.पिरजादे यांनी सहाय केले.









