प्रतिनिधी / ओरोस:
जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरवली सागरतीर्थ टाक येथील रमाकांत महादेव गोडकर व ज्ञानेश्वर महादेव गोडकर या दोघांचाही जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश 2 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी दुसऱयांदा फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
सामायिक जमीन जागेच्या रागातून रमाकांत व ज्ञानेश्वर या संशयित आरोपींनी लाडोबा महादेव गोडकर यांना तुला मारुन टाकणार, असे म्हणून लोखंडी रॉड व लाकडी दांडय़ाने मारहाण केली होती. या मारहाणीत लाडोबा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. 21 डिसेंबर 2019 रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर लाडोबा यांना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी बांबोळी-गोवा येथे पाठविण्यात आले होते. अद्यापही त्यांच्यावर बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी 25 डिसेंबर रोजी अटक केली होती. 28 डिसेंबर रोजी वेंगुर्ला न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली होती. त्यानंतर त्याने जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने 4 जानेवारी रोजी फेटाळून लावला होता. त्यानंतरचा दुसरा अर्जही फेटाळण्यात आला आहे.









