जत / प्रतिनिधी
जत तालुक्यातील खिलारवाडी येथील नाना शिवाजी लोखंडे (वय-२७ वर्षे) याचा मामानेच खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी चार आरोपींपैकी तीन जणांना अटक करण्यात आली असून एकजण फरार आहे. अर्जुन महादेव शिंदे (वय ४० वर्षे, रा. अभिनंदन कॉलनी, सांगली), जगन्नाथ बाळाप्पा लोखंडे (वय-२३ वर्षे, रा. खिलारवाडी), विनायक बाळासाहेब शिंगाडे (वय-२१ वर्षे, रा. सुभाषनगर, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे असून रावसाहेब लक्ष्मण लोखंडे, (रा. सुभाषनगर, मिरज) हा फरार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 22 जून रोजी खिलारवाडी ता. जत गावच्या हद्दीत बिळूर ते वज्रवाड जाणाऱ्या रोडलगत नाना लोखंडे यांचा खून झाला होता. पानपट्टी समोर अज्ञातांनी चार चाकी गाडीमध्ये घालून पळवून नेलेबाबत मयताचा भाऊ धानू लोखंडे यांनी जत पोलीस ठाणेत फिर्याद दिली होती.
गुन्हयाचे स्वरूप गंभीर असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सुचना दिल्या. त्याप्रमाणे तपासासाठी वेगवेगळे पथके तयार करून रवाना केली होती. अत्यंत क्लीष्ट व गुंतागुंतीचे गुन्हयाचा तपास करत पोलिसांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. हा खून मामानेच केल्याचे तपासातून उघड झाले. मुलीला पळवून नेल्याच्या रागातून नाना लोखंडेचा मामानेच खून केला. आरोपींनी त्याला पळवून नेत विजापूरमधील तोरवी गावच्या हद्दीत ओढ्याच्या पुलाजवळ डोक्यात दगड घालून खून केला. याप्रकरणी आरोपी अर्जुन महादेव शिंदे, जगन्नाथ बाळाप्पा लोखंडे, विनायक बाळासाहेब शिंगाडे या तिघांना पोलिसांनी अटक केली असून रावसाहेब लक्ष्मण लोखंडे हे फरार आहेत.








