तासगाव/प्रतिनिधी
सांगली जिल्ह्याचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे वडील, माजी डीवायएसपी आर. के. पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर ठिकठिकाणी उपचार सुरू होते. मात्र वृद्धापकाळामुळे त्यांचे शरीर उपचारांना म्हणावे तसे साथ देत नव्हते. अखेर आज (सोमवारी) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
तात्यांनी अनेक वर्षे पोलीस दलात उत्तम प्रकारे काम केले होते. डीवायएसपी या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. खासदार संजयकाका पाटील यांना घडवण्यात तात्यांचा सिंहाचा वाटा होता. तात्यांच्या निधनाने खासदार पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अनील डोंबे एन्काऊंटर नंतर महाराष्ट्रभर नाव
पंढरपूर येथील कुख्यात गुन्हेगार अनिल डोंबे याच्या कारवायांनी पंढरीचा राज्यभर बदलौकीक झाला होता. त्या काळात पंढरपूर पोलीस ठाण्यावर आर के पाटील यांची नियुक्ती झाली आणि त्याच्या विरोधात कारवाई करत असताना पोलीस दलावर हल्ला झाल्याने झालेल्या चकमकीत अनिल डोंबे याचा खात्मा करण्यात आला. महाराष्ट्रभर या कारवाईचे चांगले पडसाद उमटले. पंढरपूर शहर राज्यातील अनेक भागातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यास त्यामुळे पोलिसांना यश मिळाले आणि पाटील यांचे नाव संपूर्ण राज्यात गाजू लागले. राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी पाटील यांचे मैत्रीचे संबंध असल्याने निवृत्तीनंतरच्या काळातही पोलीस खात्यातील विविध पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आणि मार्गदर्शन करण्यात गुंतले होते. निवृत्ती नंतरच्या आयुष्यात गावातील मंदिराचा जीर्णोद्धार सह विविध वारकरी उपक्रमातही त्यांचा सहभाग होता.








