प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील तीन खासगी विद्यापीठांच्या स्थापनेसंबंधीच्या विधेयकाला बुधवारी विधानपरिषदेत आवाजी मतदानाने संमती दर्शविण्यात आली. दुपारी भोजन विरामानंतर सभागृहाचे कामकाज सुरु होताच उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी न्यू हॉरिझन, विद्याशिल्प, एट्रीया विद्यापीठांच्या स्थापनेला मंजुरी देण्यासंबंधी विधेयक मांडले.
उच्च शिक्षणाविषयी जागृती करण्यासाठी खासगी विद्यापीठांचे आवश्यकता आहे. खासगी विद्यापीठांमध्ये गैरव्यवहार झाल्यास त्यांची मान्यता रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारना आहे. खासगी शिक्षण संस्थांकडे विद्यापीठाच्या नावे सर्व प्रकारची कागदपत्रे, प्रमाणपत्रे, किमान 20 एकर जमीन असावी, अशी अट विधेयकामध्ये आहे, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.
सदर विधेयकाला विरोध व्यक्त करताना सदस्य श्रीकंठेगौडा म्हणाले, खासगी विद्यापीठांमुळे सरकारी विद्यापीठांच्या कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होईल. सी. एम. इब्राहिम म्हणाले, हे विधेयक घाईगडबडीत मांडण्यात येऊ नये. याविषयी अध्ययन करण्यासाठी सभागृह समितीची स्थापना करावी, असा सल्ला दिला.
सदस्य मरितिब्बेगौडा म्हणाले, खासगी विद्यापीठांची कार्यकक्षा निश्चित करा. परीक्षा घेणे, मूल्यमापन करून गुण देणे ही प्रक्रिया खासगी विद्यापीठेच करतात. ते आपल्या विद्यार्थ्यांना अधिक गुण देतात. त्यामुळे सरकारी नोकरीतील नेमणुकीवेळी खासगी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्याच अधिक नियुक्त्या होत आहेत. सरकारी विद्यापीठांत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे, असे सांगितले.
आवाजी मतदानाने संमती
दरम्यान, विधानरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी, शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता टिकविण्यासाठी स्पर्धा असलीच पाहिजे. त्यामुळे खासगी विद्यापीठांचीही आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले. त्यानंतर आवाजी मतदानाने हे विधेयक संमत करण्यात आले.