प्रतिनिधी/ चिपळूण
सावित्री पूल दुर्घटनेनंतर जिल्हय़ातील ब्रिटीशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यामध्येच चिपळूण-कराड मार्गावर शिरगांव येथील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर बाजूच्या खासगी जागेतील पर्यायी रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली. सततच्या अवजड वाहनांनी लगतच्या घरांना धोका निर्माण होऊ लागला. याकडे बांधकाम विभागही दुर्लक्ष करत असल्याने जागामालक पांडुरंग चिपळूणकर यांनी या रस्त्यावर खासगी मालमत्तेचा फलक लावून रस्ताच वाहतुकीसाठी बंद करून टाकला आहे.
शिरगांव येथील पांडुरंग चिपळूणकर यांच्या जागेतून हा खासगी रस्ता जात आहे. 2000च्या दरम्यान कोयना प्रकल्पातील अवजड साहित्य नेण्यासाठी शिरगाव येथे चिपळूणकर यांच्या जागेत अवजड वाहनांसाठी खासगी रस्ता बनवण्यात आला होता. कोयना प्रकल्पाने या रस्त्यावरचे काम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता फक्त रहदारीसाठी ठेवला होता. मात्र 2016 मध्ये सावित्री पूल दुर्घटनेनंतर जिह्यातील सर्वच जुने पूल बंद करण्यात आले. त्यामध्ये शिरगांव येथील पुलाचाही समावेश होता. पूल बंद झाल्यानंतर खासगी जागेतील या पर्यायी रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली.
दरम्यान, दिवस-रात्र या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडून रस्त्याची अवस्था पार बिकट झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका चिपळूणकर यांना बसला आहे. त्यामध्ये त्यांच्या घराचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या बाबत चिपळूणकर यांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केला. रस्त्यावर गतिरोधक बसवण्याबरोबरच संरक्षक कठडा बसवण्याची मागणी केली होती. वारंवार या मागणीसंदर्भात अधिकाऱयांना स्मरणपत्रेही पाठवली गेली.मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांकडून थातूरमातूर उत्तरे दिली जात असल्याने चिपळूणकर हे वैतागले होते. बांधकाम विभाग करण्यात येत असलेल्या मागणीकडे लक्ष देत नसल्याने अखेर मंगळवारी चिपळूणकर यांनी या रस्त्यावर आडवे टेबल व खासगी मालमत्तेचा फलक लावून वाहतूक बंद केली आहे. परिणामी जुना धोकादायक पूल म्हणून वाहतूक बंद केलल्या पुलावरूनच आता भरधाव वाहने धावत आहेत. त्यामुळे या पुलाच्याबाबतीत काही अनर्थ घडला तर याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.









