कोणत्याही कागदपत्रांशिवाय करण्यात येत होती वाहतूक, गुजरातच्या 5 जणांना घेतले ताब्यात
प्रतिनिधी / कारवार
बेळगावहून मंगळूरकडे निघालेल्या खासगी कंपनीच्या बसची तपासणी केली असता कोणत्याही कागदपत्रांशिवाय वाहतूक करण्यात येत असलेली 50 लाख रुपये इतकी रोख रक्कम आढळून आली. या प्रकरणी गुजरातमधील पाच व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून वेगवेगळय़ा कंपन्यांचे 23 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिसांनी जिल्हय़ातील यल्लापूर नगराच्या व्याप्तीत करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे दिनेश जी. ऊर्फ दीपक प्रभातजी ठाकुर (वय 34), पंकजकुमार ऊर्फ प्रकाश रामभाई पटेल (वय 40), गोविंदभाई नाथुदास पटेल (वय 50), मुकेशभाई चतुरभाई पटेल (वय 55) आणि उपेंद्र नारायणभाई पटेल (वय 40) अशी आहेत.
या प्रकरणाबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, बेळगावहून कलघटगीमार्गे मंगळूरकडे निघालेल्या गणेश ट्रव्हल्स नावाच्या खासगी कंपनीच्या बसमधून एक व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांशिवाय रोख रकमेची वाहतूक करीत आहे, अशी माहिती पोलीस खात्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवार जिल्हा पोलीसप्रमुख शिवप्रकाश देवराजू आणि डीवायएसपी रवी डी. नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार यल्लापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश मळ्ळूर आणि त्यांच्या सहकाऱयांनी सदर बस यल्लापूर नगराच्या व्याप्तीतील राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 वरील जोडुकेरे तलावाजवळ अडवून कसून तपासणी केली असता बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्यात येत असलेली 50 लाख रुपये इतकी रोख रक्कम आढळून आली. रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करून या प्रकरणी पाच व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.
रोख रक्कम बेळगावहून मंगळूरकडे नेण्यात येत असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणाची माहिती पोलिसांनी इन्कम टॅक्स खात्याच्या अधिकाऱयांना दिली असून पुढील चौकशी इन्कम टॅक्सचे अधिकारी करणार आहेत, असे सांगण्यात आले.
या कारवाईत यल्लापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंजुनाथ गौडा, कर्मचारी दीपक नाईक, गजानन नाईक, नागाप्पा लमाणी, मोहम्मद शफी, चालक कृष्णा म्हात्रोजी, गिरीश लमाणी सहभागी झाले होते.