वार्ताहर / खारेपाटण:
गेले दोन दिवस सतत कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे खारेपाटण वरचे स्टँड येथील मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याचा भराव खचल्याने भगदाड पडले आहे. यामुळे अपघात होण्याची दाट शक्मयता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी काही दगड लावण्यात आले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर दोन दिवसांपूर्वीच मुसळधार पावसाने सर्व्हिस रोडवरील भराव खचल्याने रस्त्याला मोठी भेग पडली होती. ‘तरुण भारत’मध्ये याबाबत वृत्त ही प्रसिद्ध होताच तसेच ग्रामस्थांनी याबाबतीत संबंधीत विभागाला कल्पना देऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली होती, सार्वजनिक बांधकाम विभाग व हायवे प्राधिकरणतर्फे तातडीने या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करून सुमारे 300 फूट रस्त्यावर पुन्हा काँक्रिटीकरण करण्यात आले होते. पण आज या रस्त्याला पुन्हा एकदा सुमारे 3 फूट रुंद व चार फूट खोल असे मोठे भगदाड रस्त्याच्या मधोमध पडले आहे. यामुळे ठेकेदाराच्या निकृष्ट बांधकामचे पितळ उघडे पडले आहे. महामार्ग प्राधिकरण व ठेकेदर जनतेच्या जीवाशी खेळत आहेत का, असा सवाल यामुळे उपस्थित केला जात आहे.
मुळात या रस्त्याला टाकण्यात आलेला भराव हा व्यवस्थित न टाकल्यामुळे वारंवार या रस्त्यावर तळात असलेला मातीचा भराव खचून भगदाड पडत आहे. घाईगडबडीने खचलेल्या रस्त्याचे केलेले काँक्रिटीकरण हे निकृष्ट दर्जाचे असल्यानेच एका दिवसात रस्त्याला भगदाड पडले. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ओटवणेकर हे फक्त आश्वासन देऊन समाधान करत आहेत. प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही, असे ग्रामस्थांचे आरोप आहेत.









