मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 27 जुलै रोजी उपक्रम : संजय पडते, नागेंद्र परब यांची माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 27 जुलैला मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा खारेपाटण ते झारापपर्यंत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. वृक्षारोपण करताना आंबा, काजू, कोकम, वड, पिंपळ ही फळे व सावली देणारी झाडे लावली जाणार आहेत. त्या दिवशी सायंकाळी चार वाजता ओसरगांव येथे त्याचा शुभारंभ केली जाणार आहे. आठवडाभर प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिरे घेतली जाणार आहेत, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते व जि. प. तील गटनेते नागेंद्र परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 27 जुलैला वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविले जाणार होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलाच वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. परंतु स्वत: मुख्यमंत्र्यांनीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जिल्हा शिवसेनेच्यावतीने सामाजिक उपक्रम राबवून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा खारेपाटण ते झारापपर्यंत वृक्षारोपण केले जाणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे निसर्गाने नटलेला होता. आता पुन्हा वृक्षरोपण करुन पूर्वीप्रमाणेच केला जाणार आहे. आंबा, काजू, कोकम, वड, पिंपळ ही कोकणी फळे देणारी व सावली देणारीच झाडे लावली जाणार आहेत. तसेच वेताळ बांबर्डे येथील वेलणकर फार्म नर्सरी यांच्या पुढाकारातून महामार्ग चौपदरीकरणाच्या मधल्या डिव्हायडरमध्ये सोनचाफ्यांची फुले झाडे लावली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कुडाळ ते झाराप सोनसाफ्याची झाडे लावली जाणार आहेत. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा शुभारंभ केला जाणार आहे.
रक्तदान शिबिरेही घेतली जाणार असून 27 जुलैला देवगड मध्ये 28 वैभववाडी, 29 रोजी दोडामार्ग, 30 रोजी सावंतवाडी, 31 रोजी वेंगुर्ला, 1 ऑगस्टला कुडाळ, 2 ऑगस्टला मालवण आणि कणकवली मध्ये यापूर्वी घेतलेले आहे. या दिवशी प्रत्येक गावात वाडी तिथे शाखा व शाखा तिथे शिवसेनेचा झेंडा हा पक्षाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शेतकऱयांना काजू, जायफळ, दालचिनीच्या झाडांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पडते व परब यांनी दिली.









