काहींच्या त्वचेला इन्फेक्शन झाल्याने निर्णय
प्रतिनिधी / कणकवली:
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार शनिवारी रात्री 10 नंतर मुंबई व इतर जिल्हय़ातून येणाऱया प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारणे बंद करण्यात आले. शिक्के मारल्यावर काही प्रवाशांच्या हातावर शिक्क्याच्या ठिकाणी फोड येण्यासारखे प्रकार घडल्याने शिक्के बंद करण्यात आले. मात्र, शिक्क्यांऐवजी हमिपत्राच्या आधारे जिल्हय़ात सोडण्यात येत आहे. याबाबतची संपूर्ण माहिती संबंधित गावाच्या सनियंत्रण समितीला देऊन त्या प्रवाशांची जबाबदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
खारेपाटण तपासणी नाका येथे प्रवाशांना आरोग्य तपासणी करून व कागदपत्रांची पूर्तता करून होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात येत होते. परंतु या शिक्क्मयामध्ये वापरण्यात येणाऱया शाईपासून काही प्रवाशांच्या त्वचेला इन्फेक्शन झाल्याचे आढळून आले. तशा तक्रारी प्रवाशांकडून प्राप्त झाल्या. याची जिल्हा प्रशासनाकडून दखल घेऊन हे शिक्के प्रवाशांच्या हातावर मारण्यास प्रतिबंध करण्यात आला.
शिक्के नसलेले ओळखणे कठिण
मुंबई अथवा इतर रेडझोनसारख्या भागातून आलेल्या प्रवाशांच्या ओळखीसाठी हे शिक्के मारण्यात येत होते. हे शिक्के हातावर असल्याने स्थानिक ग्रामस्थ व प्रशासन अशा नागरिकांना ओळखू शकत होते. परंतु आता हे शिक्के बंद केल्यामुळे गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. शिक्के नसलेले नागरिक सहजपणे इतरांच्या संपर्कात येऊ शकतात. यासाठी उपाययोजना म्हणून अशा प्रवाशांची माहिती स्थानिक गावच्या सनियंत्रण समितीला देऊन अशा नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवणे अथवा इतरत्र फिरू न देणे याची संपूर्ण जबाबदारी येथील सनियंत्रण समितीला घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दिवसभरात साडेसहा हजार चाकरमानी
शनिवारी एका दिवसात सुमारे 6475 चाकरमानी जिल्हय़ात दाखल झाल्यामुळे प्रशासनही हतबल ठरले आहे. खारेपाटण तपासणी नाक्मयावर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला असून येथील कर्मचारी रविवारी पहाटे 4 पर्यंत या चाकरमान्यांची तपासणी व कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हय़ात सोडण्याच्या कामांमध्ये कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. यासाठी एकूण 7 पथके या ठिकाणी कार्यरत होती. आरोग्य व पोलीस यंत्रणेने खारेपाटण सीमेवर केलेले कार्य प्रशंसनीय असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. रविवारी मात्र चाकरमानी येण्याचा ओघ काहीसा कमी होता.









