आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची सत्कार सोहळय़ात ग्वाही : बसवेश्वर चौकातून भव्य मिरवणूक
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्यात सरकारी योजनांचा लाभ गरिबांच्या घरापर्यंत पोहोचावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. तसेच तालुक्याच्या विकासासाठी सरकारदरबारी अनेक योजनांचा पाठपुरावा करण्यात आला. त्यापैकी काही योजना आता मार्गी लागल्या आहेत. इतकी वर्षे खानापूरची मागास तालुका म्हणूनच ख्याती होती. हे मागासलेपण पुसून काढण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी येथील शिवस्मारकात झालेल्या सत्कार सोहळय़ात बोलताना दिली.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण व पदयात्रा विभागाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल तसेच हणगल विधानसभा मतदारसंघात स्टार प्रचारक म्हणून कार्य करून पक्षाला विजय मिळवून दिला. याबद्दल त्यांचा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्या पुढे म्हणाल्या, तालुक्यातील विविध रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. तसेच तालुक्याला पाचशे वर्गखोल्या मंजूर केल्या आहेत. खानापूरला एमसीएच हॉस्पिटल इमारतीचे काम सुरू आहे. गवळीवाडय़ाला जाणाऱया रस्त्यावरील पुलाची समस्या दूर केली आहे. याशिवाय आता विधानसभेत तालुक्यातील रखडलेल्या विकासकामांना वाचा फोडली आहे. टप्प्याटप्प्याने सर्व विकासकामे पूर्ण केली जातील, असे सांगून यावेळी त्यांनी केंद्र व राज्यातील भाजप शासनाच्या कारभाराचाही खरपूस समाचार घेतला.
भाजपवर साधला निशाणा
केंद्र शासनाने गरिबांना एकीकडे मोफत गॅस दिले. आणि दुसरीकडे गॅसचे दर भरमसाठ वाढविले. यामुळे गॅस घेणेदेखील गरिबांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. देशातील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाची धास्ती घेऊन केवळ अल्पस्वरुपात पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले. भाजपची हिंदूनिष्ठा देखील वेगळी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
याआधी जांबोटी क्रॉसवरील बसवेश्वर चौकातून आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांनी संत बसवेश्वर महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच शिवस्मारकाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर शिवस्मारकात झालेल्या सत्कार सोहळय़ाच्या अध्यक्षस्थानी ओमकारेश्वर महाराज होते.
प्रारंभी जॅकी फर्नांडिस यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर गुरुलिंगय्या हिरेमठ यांनी प्रास्ताविक केले. आमदार अंजली निंबाळकर यांचे अभिनंदन करणारी गौसलाल पटेल, जयकुमार चापगावकर, कल्लाप्पा देशनूर, मल्लेश चौगुले, हलशी ग्रा. पं. चे उपाध्यक्ष संतोष हंजी, महांतेश राऊत, महांतेश संबरगी तसेच ओमकारेश्वर महाराज यांची भाषणे झाली. यावेळी खानापूर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष मधू कवळेकर,, खानापूर ब्लॉक महिला काँग्रेस अध्यक्षा सुनिता दंडगल, ग्रामीण महिला ब्लॉक अध्यक्षा गीता अंबडकट्टी यांच्या हस्ते पक्षाच्यावतीने आमदार अंजली निंबाळकर यांना शाल, श्रीफळ अर्पण करून सन्मानित करण्यात आले. यानंतर तालुक्यातील विविध संस्था, युवक मंडळे, महिला संघटनांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला जि. पं. माजी सदस्य, ता. पं. सदस्य, विविध ग्रा. पं. चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









