प्रतिनिधी / विटा
गेल्या पंधरावड्यात रुग्ण संख्या वाढू लागल्याने धास्तावलेल्या खानापूर तालुक्याला मंगळवारी दिलासा मिळाला. तालुक्यातील तब्बल 53 लोकांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने विटा शहरासह तालुक्याने काहीसा मोकळा श्वास घेतला. तालुक्यात आतापर्यंत जवळपास 126 रुग्णसंख्या झाली आहे. यापैकी 74 लोकांवर उपचार सुरू आहेत, तर कोरोणामुक्तीचे अर्धशतक झाले आहे. सध्या 44 लोकांवर विट्यातील कोव्हीड केअर सेन्टर मध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी दिली.
सुरुवातीला कोरोना संसर्गापासून दूर राहिलेल्या खानापूर तालुक्याला गेल्या पंधरावड्यात धक्के बसले. तत्पूर्वी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक तालुक्यात दाखल झाले. मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वांनी अलगिकरणाचे नियम पाळल्याने अपवाद वगळता तालुका सुरक्षित राहिला.
मात्र गेल्या पंधरावड्यात खानापूर तालुक्यात आणि विटा शहरात देखील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. अँटिजेन टेस्ट मोठ्या प्रमाणात झाल्या. नगरपालिका, पंचायत समिती आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा कमी जास्त प्रमाणात शिरकाव झाला आणि कोरोना रुग्णसंख्या शंभरावर पोहचली. या दरम्यान दुर्दैवाने तीन रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.
खानापूर तालुक्यात जवळपास 50 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोना रुग्णांचे शतक झाले असताना कोरोना मुक्तीचे देखील अर्धशतक झाले आहे. सध्या विट्यातील कोरोना केअर सेन्टर येथे जवळपास 44 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर चार रुग्ण ग्रामीण रुग्णालयात कोरोना उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्णांवर सांगली, मिरज आणि विट्यात उपचार सुरू आहेत. सध्या तालुक्यातील एकूण 74 लोकांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लोखंडे यांनी दिली.








