खानापूर / प्रतिनिधी
कर्नाटक राज्यातील परिवहन कर्मचाऱयांना आपल्या मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून संप सुरु केल्याने खानापूर आगारातून एकही बस रस्त्यावर आली नव्हती. मात्र यामुळे खानापूरहून बेळगावला जाणाऱया किंवा ग्रामीण भागातून खानापूरला येणाऱया प्रवाशांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. पण अखेर तालुका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन सोमवारी खानापूर आगारातून बससेवा सुरु करण्यास परिवहन कर्मचाऱयांना भाग पाडले. यासाठी तहसीलदार रेष्मा तालीकोटी, पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, खानापूरचे पोलीस उपनिरीक्षक बसगौडा पाटील, नंदगडचे पोलीस उपनिरीक्षक यु. एस. आवटी व त्यांचे सहकारी पोलीस सकाळापासूनच बसस्थानक आणि आगाराच्या आवारात ठाण मांडून उभे होते. सकाळी खानापूर-बेळगाव मार्गावर पहिली बस सोडण्यात आली. तर दुपारी याच मार्गावर आणखीन एक बस सोडण्यात आली. यानंतर परिवहन कर्मचाऱयांनी आंदोलन मागे घेतल्याचे वृत्त आल्यानंतर सायंकाळी खानापूर आगारातून बससेवा पूर्ववत करण्यात आली. आता मंगळवारपासून सर्व मार्गावर ठरल्याप्रमाणे बससेवा सुरु राहणार आहेत.









