राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मत
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील खाण व्यावसाय सुरू करण्यासाठी केंद्रासह राज्य सरकार प्रयत्नशील असून कायदेशीर किंवा संसदीय मार्गाने तो उद्योग चालू व्हावा, अशी सर्वांची इच्छा आहे. म्हणून सर्वांनी समतोल साधावा व विरोधकांनी तो राखावा, असे मत राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी प्रकट केले आहे.
काही प्रासारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की खाणी बंदचा मोठा परिणाम राज्यातील विकासकामांवर झाला असून आर्थिक परिस्थिती देखील बिघडली आहे. हा प्रश्न न्यायालयातही प्रलंबित असून तेथे काय होणार हे कोणी सांगू शकत नाही. त्या ठिकाणी काहीतरी तोडगा निघाला तर चांगली गोष्ट आहे. कायदेशीर मार्गाने खाणी सुरू झाल्या तर बरेच होईल, नाहीतर संसदीय मार्गाने काय करता येईल त्याचा विचार करावा लागेल. कायदेशीर किंवा संसदीय हे दोनच मार्ग आणि पर्याय सध्या उपलब्ध आहेत, असे मलिक यांनी नमूद केले.
पंचायतींच्या शिष्टमंडळाने आपली भेट घेऊन अनेक प्रश्न मांडले. त्या सर्व खाणींशी संबंधित आहेत. खाण बंदीचे परिणाम कसे झाले याची माहिती त्यांनी दिल्याचे मलिक म्हणाले. महसूल प्राप्तीचे अनेक मार्ग सध्या बंद झाले आहेत. ते सुरू करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री खाणी सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे मलिक यांनी सांगितले.
खाणी सुरू होण्यासाठी प्रयत्नशील
गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू झाला पाहिजे या मताचा आपण असून त्यावर अवलंबून असलेल्यांचे पोट महत्वाचे आहे. खाण बंदीस कारणीभूत ठरलेल्या गोवा फाऊंडेशन आणि इतर संस्थांशी आपण बोलणी करेन, असे निवेदन राज्यपाल मलिक यांनी केले आहे. खाणी बंद झाल्यामुळे अनेकांच्या नोकऱया, लहान उद्योग बुडाले याची कल्पना आहे. त्यामुळे खाणी सुरू झाल्याशिवाय हे सर्व पूर्वपदावर येणार नाही, हे देखील तितकेच खरे आहे. खाणी सुरू होण्यासाठी प्रयत्नशील रहाण्याचे आश्वासन त्यांनी दिले.









