व्हॉट्सअप विद्यापीठ हे ज्ञानाचे अंगण आम्हाला दिले आहे आंदण इंटरनेटने. लॉकडाऊनच्या काळात किराणा माल आणि भाज्या सहजी मिळत नसताना माझ्या असंख्य वहिनी आणि भगिनी रोज चमचमीत पदार्थ बनवतात आणि त्यांचे रंगीत फोटो व्हॉट्सपवर टाकतात. याचे मला परवा परवापर्यंत कौतुक वाटायचे. कधी कधी असूयादेखील वाटायची. आमच्या घरात पोहे, उपमा आणि थालीपीठ हे तीनच न्याहारीचे पदार्थ आणि एक दिवस पोळीभाजी आणि एक दिवस मसालेभात असे मेन्यू असूनही आम्ही दिवसभर स्वतः रांधा, स्वतःला वाढा आणि स्वतःची उष्टी काढा यातच थकून जातो. या वहिनी आणि भगिनी रोज साग्रसंगीत स्वयंपाक कसा करतात. त्यांचे फोटो काढून एडिट करून व्हॉट्सपवर टाकून एवढी भांडी घासायला आमचे बांधव वेळ कसा काढतात, काही कळत नव्हते.
पण नंतर रहस्य कळले. त्यांच्या घरी आमच्यासारखेच मेन्यू होते. पण गोदाक्काच्या कवी नव्याने स्वर्गीय परीच्या अंगप्रत्यंगांवर गझल गावी किंवा बेंबटय़ाच्या ब्रॉडमायंडेड बायकोने बोल्ड प्रणयकथा लिहावी तसे हे सगळे काल्पनिक प्रकरण होते. मग मी पण उत्साहाने कामाला लागलो. इंटरनेटवर चक्कर मारली. विविध पदार्थांचे फोटो कॉपी केले. मग रोज ते व्हॉट्सअप आणि फेसबुकवर प्रसिद्ध करायला सुरुवात केली. बघता बघता मी आणि माझी बायको दोघे अनुक्रमे प्रती संजीव कपूर आणि प्रती कमलाबाई ओगले ओळखले जाऊ असे वाटू लागले. पण हाय,
त्या दिवशी सकाळी आम्ही दोघे उशिरा उठलो होतो. कालचा मसाले भात शिल्लक होता. त्यामुळे आज पोहे, उपमा किंवा थालीपीठ न करता तोच भात गरम करून खायला घेतला होता. त्यामुळे मूड उदास होता. आठव्या जन्मी त्याच पत्नीशी/पतीशी लग्न झाल्यावर पतीचा/पत्नीचा मूड जसा उदास होत असेल तसा. माझ्याच एका मित्राने माझ्यावर लेख लिहिला आणि तो सर्वत्र प्रसिद्ध केला. त्यात म्हटले होते,
काही लोक अतिशय स्वार्थी असतात. त्यांना सामाजिक बांधीलकी नसते. आज देशात लाखो मजूर परगावी अडकून पडले आहेत. त्यांचे दु:ख जाणून न घेता हे घरी मेजवान्या झोडत आहेत. रोज चमचमीत पदार्थ करून खात आहेत. यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे समाजकंटक आहेत, देशद्रोही आहेत… आम्ही शिळा भात संपवला आणि प्लेट्स उचलून मी चहा ठेवायला किचनमध्ये गेलो.








