पांडवांच्या प्रार्थनेनुसार भगवंताने विश्वकर्म्याकडून अतिशय सुंदर नगराची रचना करून घेतली. त्या नूतन इंद्रप्रस्थ नगरात आता पांडव राहू लागले. कृष्णही तेथे मुक्कामाला होता. पांडवांना इंद्रप्रस्थ राज्य म्हणून जो प्रदेश धृतराष्ट्राने दिला होता तो बराचसा घनदाट खांडव वनाने व्यापला होता. राज्य करायचे तर लोकवस्ती हवी. त्यासाठी शेतीयोग्य जमिनी हव्यात, जलाशये हवीत, नगरे हवीत, व्यापार उदिम, रस्ते हवेत. या वनाचे काय करावे, याचा पांडव व कृष्ण विचार करत होते.
इकडे अग्नीला भूक लागल्याने तो खांडव वन जाळायला निघाला. त्यावेळी इंद्राने प्रचंड वर्षाव करून आग विझवली. अग्नीला काय करावे हे समजेना म्हणून तो ब्रह्मदेवापाशी गेला. त्याचे गाऱहाणे ऐकून ब्रह्मदेव म्हणाला-हे अग्नी! सांप्रत नर व नारायण हे अर्जुन व कृष्ण रूपात पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत. तू त्यांची मदत घे.
कृष्णें सज्ज केला रथ । आरूढोनियां पार्थासहित। मृगयाव्याजें निघाले त्वरित। खाण्डवप्रांत अधि÷िला। तंव अकस्मात हुताशन । भेटला विप्रवेशें येऊन। याचितां तयासि खाण्डववन ।
केलें अर्पण गदहरणा। इंद्र निवारी वर्षोनि घना। पावक जाणवी कृष्णार्जुना। तिहीं देऊनि अभयदाना। शरसंधाना आदरिलें । द्वादश योजनें गगना आंत । अभेद्य मंडप शरनिर्मित।
निर्मूनि पर्जन्य वारिला त्वरित । पावकें स्वस्थ वन ग्रासिलें। अस्त्रीं शस्त्रीं करूनि युद्ध। भंगूनि अमरेंद्र सुरासुर प्रुद्ध । अर्जुनरूपें धनुर्वेद । जातवेदा संतर्पी।तेथ जळतां मयदानव ।
तेणें स्तविले कृष्णपाण्डव । तेव्हां अवलंबूनियां कींव। रक्षिला जीव तयाचा ।
एकदा अर्जुन शिकारीसाठी निघाला. त्याच्या रथाचे सारथ्य कृष्ण करीत होता. त्यांनी खांडव वनात प्रवेश केला. त्यावेळी ब्राह्मण वेशात अग्नी तेथे आला व त्याने खांडव वनाचे दान मागितले. अर्जुनाने ते त्वरित दिले. तेव्हा अग्नीदेव प्रकट झाला व त्याने खांडव दहनात इंद्रदेव पाऊस पाडून कसा अडथळा आणत आहे हे सांगितले. त्याने कृष्ण अर्जुनाकडे मदतीची याचना केली. कृष्ण व अर्जुन यांनी त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले. अर्जुनाने लागलीच उंच आकाशात बाणांचा एक मंडप तयार करून संपूर्ण खांडववनावर बाणांचे आवरण तयार केले. मग अग्नीने खांडव वनात वणवा पेटवला. वायुने त्याला मदत केली व आग सर्वत्रपसरली. खांडव वन जळू लागले. इंद्राने तुफान पावसाचा वर्षाव केला पण अर्जुनाने बनवलेला शर मंडप तो भेदू शकला नाही. अग्नी पसरत गेला. खांडव वनात अनेक हिंस्त्र श्वापदे, नाग, राक्षस वस्ती करून होते. तक्षक नावाचा नाग याच वनात होता. तो बाहेरदेशी गेला असल्याने वाचला. त्याचा भाऊ अश्वसेन मात्र युक्तीने निसटला. पण त्यांचे कुटुंबीय अनेक नाग व सर्प या आगीत जळून मरण पावले. त्यामुळे तक्षक व अश्वसेन हे नागबंधू पांडवांचे अखेरपर्यंत वैरी बनले. अनेक वृक्ष वेली जळून खाक झाल्या. अनेक वन्य श्वापदे अग्नीची भक्ष्य झाली.








