अमृतपालच्या सहकाऱयावर एनएसए अंतर्गत गुन्हा
@ वृत्तसंस्था / चंदीगड
वारिस पंजाब दे चा प्रमुख अमृतपाल सिंह याचा निकटवर्तीय पपलप्रीत सिंहला मंगळवारी पहाटे आसाममध्ये पाठविण्यात आले आहे. पपलप्रीतला अमृतपाल सिंहच्या 8 अन्य साथीदारांसोबत डिब्रूगड तुरुंगात ठेवले जाणार आहे. पंजाब पोलिसांनी पपलप्रीतवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
दुसरीकडे खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंहच्या सहकाऱयांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांप्रकरणी पंजाब सरकारने स्वतःची भूमिका मांडली आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यासंबंधी सरकारने सल्लागार मंडळ स्थापन केल्याची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे. अमृतपालच्या सहकाऱयांना आता या सल्लागार मंडळासमोर दाद मागावी लागणार आहे. तर उच्च न्यायालयात संबंधित याचिकांवर पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे.
अमृतसरच्या श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पपलप्रीतसोबत पोलीस पथक आसामसाठी रवाना झाले आहे. पपलप्रीतला पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. अमृतसरच्या कत्थूनंगल येथून त्याला ताब्यात घेण्यात आले होते.
उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत अमृतपाल सिंहच्या मुद्दय़ावरून राज्य सरकार तसेच पोलिसांना फटकारले होते. अमृतपाल देशासाठी धोकादायक असेल तर त्याला अटक का करण्यात आली नाही? 80 हजार पोलिसांच्या घेऱयातून तो कसा फरार झाला असा प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने याला पोलिसांचे अपयश ठरविले होते.









