अध्याय तेविसावा
धनलोभी ब्राह्मणाने उपरती झाल्यावर धनाचा मोह सोडून दिला. मनोमन निश्चय करून, त्याने मी, माझेपणाची गाठ तोडून टाकली. यानंतर तो शांत होऊन, मौन धारण करून संन्यासी झाला. आपले मन, इंद्रिये आणि प्राण वश करून कोणतीही आसक्ती न ठेवता तो पृथ्वीवर स्वच्छंदपणे वागू लागला. मी केलेला निश्चय पूर्णपणे साधीनच साधीन असा विचार करून तो अत्यंत उल्हासाने परमार्थाचा साधक झाला. असा साधक होण्यापूर्वी तो असा विचार करत असे की, माझ्या दुःखाला माझा मीच कारण झालो. काम, लोभ आणि द्रव्याचा अभिमान धरल्यामुळे माझे मलाच अतिशय दुःख भोगावे लागले. माझे भाऊबंदही मला विमुख झाले, तेव्हा त्यांचा तरी आता मला लोभ कसला? बायको, मुले, आप्तेष्ट, द्रव्य, या सर्वांच्या लोभाचे मुख्य कारण माझा मलाच झालेला देहाभिमान होय. ह्या देहाभिमानालाच आता साष्टांग नमस्कार असो. पाणी आणि त्यात पडलेले चंदाचे प्रतिबिंब या दोघांचे राहणे एकत्र असते असे दिसून येते पण चंद्र पाण्यापासून अगदी निराळा असतो. त्याप्रमाणेच तुमच्याशी माझा आता संबंध नाही.
ज्याप्रमाणे रात्रंदिवस छाया ही पदार्थाबरोबर खिळलेली असते, तरी तो पदार्थ काही आपल्या छायेपाशी बसून राहात नाही, त्याप्रमाणे तुमचा मला संबंध नाही. ज्याप्रमाणे देहाजवळ तारुण्य येते आणि त्या तारुण्याने देह मुसमुसू लागतो पण शेवटी तारुण्यदेहाला सोडून जाते. त्याप्रमाणेच मी तुम्हाला सोडले आहे. वनामध्ये वसंतऋतूचा प्रवेश झाला म्हणजे त्याच्या योगाने वनश्री शोभेचा दिमाख दाखवू लागते. पण तो वसंत आपला काळ संपताच ज्याप्रमाणे वन सोडून निघून जातो, त्याप्रमाणेच मी अहंममता सोडीत आहे. वैराग्यासह विवेकाचे सामर्थ्य मोठे आश्चर्यकारक आहे. त्याने मजकडून केवढा अलौकिक त्याग करविला! त्यामुळे देहाभिमानाला व ममतेला मी तिलोदकच दिले. ज्याप्रमाणे फळ पिकले म्हणजे आपल्या जन्मकाळच्या देहाचा त्याग करते, देठही त्या फळाला धरीत नाही व फळ देठाला धरीत नाही त्याप्रमाणे हा अहंतेला धरत नाही व अहंता ह्याच्यापाशी येत नाही. हाही सद्भावनेने देहाभिमानाला शिवत नाही. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यामध्ये असूनसुद्धा ते त्या पाण्यापासून अलिप्त असते, त्याप्रमाणे देहाभिमानाला स्पर्श न करिता त्याने विधियुक्त संन्यास घेतला. इतर संन्यासी होम करून आम्ही क्रोध व काम जाळला असे म्हणतात, पण अखेरीस तीळ व तूप यांचे मात्र भस्म होते आणि कामक्रोध जसेच्या तसेच राहतात. तसा काही याच्या होमाचा प्रकार नव्हता. त्याने मनात येणारे विचार रोखून धरले होते आणि अहंकारासह कामक्रोधांची पूर्णाहुती केली होती. आपल्या मूळ स्वभावाचा होम करून तो त्रिदंडी संन्यासी झाला आणि गुरूपाशी आज्ञा मागून सुखाने आनंदात फिरू लागला. आपले मन, इंद्रिये आणि प्राण वश करून कोणतीही आसक्ती न ठेवता तो पृथ्वीवर स्वच्छंदपणे फिरू लागला. भिक्षेसाठी तो शहरात किंवा खेडय़ात कोणालाही कळणार नाही अशा रीतीने जात असे. मन व प्राण यांना जिंकून मानाभिमान सोडून परमानंदाने परिपूर्ण होऊन तो पृथ्वीवर संचार करू लागला.
देहाची संगती ज्याला आवडत नाही, त्याला बरोबर दुसरा सोबतीला घेणे कसे रुचणार? तो आत्मज्ञानाने आत्मस्वरूपामध्ये निमग्न होऊन पृथ्वीवर एकटाच फिरत होता. निरंतर अरण्यामध्येच रहात असे. भिक्षेसाठी मात्र गावात येई आणि जेथे बाजार भरत असेल अशा शहरात किंवा गावातून मिळेल ती भिक्षा आणीत असे. जे हातावर पडेल तेवढय़ात संतोष मानावयाचा. कोणत्याही गोष्टीविषयीचा अहंकार त्याला लेशमात्रही नव्हता. याप्रमाणे पृथ्वीवर संचार करता करता अकस्मात तो अवंती नगरांत आला. तेव्हा अत्यंत वृद्ध संन्यासी अवधूतवेषात येताना लोकांनी पाहिला पण त्याच्यासबंधीच्या जुन्या गोष्टी आठवून त्यांनी त्याला हवा तितका त्रास दिला. तरीही त्याच्या चित्ताला पालट म्हणून झाला नाही. तो मुळीच रागावला नाही. असा तो अत्यंत विवेकी व मोठा धैर्यवान झाला होता.
क्रमशः








