प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहरात गुरुवार बागेच्या समोर गेल्या कित्येक दिवसापासून खड्डा आहे. तो खड्डा दिवसाही वाहनधारकांना त्रासदायक ठरतो. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा खड्डा चुकवण्याच्या नादात टेम्पो आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात पिलाणी (ता. सातारा) येथील विनायक संपतराव साळुंखे (वय 32) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
सातारा तालुक्यातील पिलाणी येथील विनायक हा एकुलता एक होता. तो व्यवसायाने फोटोग्राफर होता. कामानिमित्त साताऱ्यात शुक्रवारी आला होता. काम आटोपून घरी परत रात्री दुचाकीवरुन निघाला होता. शाहु चौकातून समर्थ मंदिरमार्गे तसेच पिलाणीला जाण्यासाठी त्याची दुचाकी वळली. गुरुवार बागेच्यासमोर एक खड्डा आहे तो चुकवण्याच्या नादात समोरुन आलेली पिकअप व त्याची दुचाकी या दोघांचा अपघात झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विनायकला स्थानिकांनी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत हवालदार अरुण दगडे अधिक तपास करत आहेत.









