निचरा होण्यास अडथळा : स्मार्ट सिटीकरिता खर्ची घातलेला निधी पाण्यात गेल्याची तक्रार
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहराला स्मार्ट बनविण्यासाठी कोटय़वधीचा निधी खर्च करण्यात येत आहे. पण खडेबाजार शहापूर परिसरात राबविण्यात आलेल्या विकासकामांची परिस्थिती पाहता पेव्हर्सखालून सांडपाणी वाहत आहे. सदर काम व्यवस्थित झाले नसल्याने स्मार्ट सिटीकरिता खर्ची घालण्यात आलेला निधी पाण्यात गेला असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
संपूर्ण शहर स्मार्ट बनविण्यासाठी विविध विकासकामे राबविण्यात आली आहेत. या अंतर्गत खडेबाजार शहापूर मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा सांडपाणी वाहण्यासाठी पाईप घालण्यात आल्या आहेत. त्यावर पेव्हर्स घालून रस्ता व्यवस्थित करण्यात आला आहे. पाईपमधून पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी सांडपाणी साचत आहे. शहापूर परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी पेव्हर्सच्या खालून सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. काही दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. समस्यांचे निवारण होण्याऐवजी आणखी समस्येत भर पडली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आलेला निधी पावसाच्या पाण्यात राहून गेल्याची टीका नागरिक करीत आहेत. येथील व्यावसायिकांना भेडसावणाऱया समस्यांचे निवारण करण्यासाठी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.









