मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल, पुढील तपास सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
खडेबाजार-बेळगाव येथील अंबाबाई मंदिरामध्ये मंगळवारी सकाळी चोरीची धक्कादायक घटना घडकीस आली आहे. यामुळे खळबळ माजली असून चोरटय़ांनी चांदीचे किरीट चोरुन नेले आहे. या प्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात या मंदिराच्या पुजाऱयांनी फिर्याद दिली आहे.
बेळगाव -खडेबाजार येथील अंबाबाई मंदिरामध्ये नेहमीप्रमाणे पुजारी ओमकार कावळे हे पूजा करण्याच्या तयारीत होते. मंदिर स्वच्छ करुन ते पाणी आणण्यासाठी बाहेर गेले होते. त्याचवेळी चोरटय़ांनी 330 ग्रॅम वजनाचे चांदीचे किरीट लांबविले आहे. पाणी आणल्यानंतर ओमकार यांच्या लक्षात सदर बाब आली. त्यानंतर त्यांनी शोधाशोध केली. मात्र तोपर्यंत चोरटे तेथून पसार झाले होते. केवळ 10 ते 15 मिनीटांमध्ये ही चोरी झाली आहे. त्यामुळे चोरटय़ांनी पाळतच ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चोरीच्या या घटनेनंतर मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.









