खाणमालकांचा दावा : रीतसर परवाने घेऊनच खाणी सुरू, सरकारी नियमांनुसारच स्फोट
वार्ताहर /केपे
उगे गावातील ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही लोक करत असून खडीच्या खाणींबद्दल चुकीची माहिती देत आहेत. खडीच्या खाणी रीतसर परवाने घेऊनच सुरू आहेत तसेच स्फोटांसाठी वापरल्या जाणाऱया तंत्राची चाचणी करूनच सरकारने परवानगी दिली आहे, असे आलेक्स बाप्तिस्ता यांनी केपे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यावेळी डायगो पेरेरा आणि जेसन पेरेरा आदी खाणमालक उपस्थित होते.
सर्व परवाने घेऊनच आम्ही खडीच्या खाणी चालवत आहोत. स्फोट सुद्धा सरकारी नियमांनुसारच केले जात आहेत, अशी माहिती आलेक्स यांनी दिली. ग्रामस्थांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करणारे आपला स्वार्थ साधू पाहत आहेत, असा आरोप त्यांनी केला. याच लोकांनी सोशिएदादच्या जमिनीत बेकायदेशीर व्यवसाय करून त्या जमिनी बळकावल्या आहेत. सांगे दौऱयावर आल्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या सोशिएदादच्या जमिनीत सुरू असलेले बेकायदेशीर व्यवसाय बंद करावेत, असा इशारा दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱयानंतर त्या लोकांचे व्यवसाय बंद पडलेले आहेत. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या या लोकांना आता खडीच्या खाणी बंद पाडायच्या आहेत. म्हणून ते उगेतील ग्रामस्थांना पुढे काढून त्यांच्यामार्फत आपला फायदा करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
नियम पाळूनच स्फोट
स्फोटांमुळे घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्या आरोपांचे आलेक्स यांनी खंडन केले. 1975 पासून येथे खाणी सुरू आहेत. सर्व नियम पाळूनच स्फोट केले जात आहेत. लोकांच्या तक्रारीनंतर तत्कालीन उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांच्या उपस्थितीत खाण सुरक्षा अधिकाऱयांनी दुप्पट क्षमतेने स्फोट करून ‘व्हायब्रेशन’ची चाचणी करून पहिली होती. त्याचा अहवाल सकारात्मक आल्यानंतरच आम्हाला स्फोट करण्याची परवानगी देण्यात आली होती. उपजिल्हाधिकाऱयांनी स्फोट करण्याच्या प्रक्रियेमध्ये सूचवलेले बदल आम्ही अंमलात आणलेले आहेत. स्फोटांसाठी लागणारा दारूगोळा सरकार आम्हाला पुरवत आहे आणि त्याचा हिशेब आम्ही नियमितपणे सरकारला सादर करत आहोत, असे जेसन पेरेरा यांनी सांगितले.
जे लोक आता आंदोलनाची भाषा करत आहेत त्यांनी यापूर्वी आमच्या खाणींवरून माल नेलेला आहे. त्यांचे ट्रक खाणींवर चालत होते. लोकांना भडकावणाऱयांनी अजून आमच्या मालाचे पैसेही दिलेले नाहीत. हे लोक उगेवासियांच्या भोळेपणाचा फायदा उठवत आहेत, असा दावा जेसन यांनी केला. खाणी आणि लोकवस्ती यांच्यात सुमारे तीन किलोमीटरांचे अंतर आहे. मध्ये एक नालाही आहे. त्यामुळे स्फोटाचे ‘व्हायब्रेशन’ गावात पोहोचू शकत नाही. खाणींजवळ एका पंपहाऊसचे बांधकाम असून ‘व्हायब्रेशन’मुळे खरे तर त्या बांधकामाला तडे जाणे आवश्यक होते, असा दावा जेसन यांनी केला.
लोकांनी दिशाभूल करण्याच्या चाललेल्या प्रकारांना बळी पडू नये. त्यांनी स्वतः स्फोटांचे व्हायब्रेशन तपासून शहानिशा करावी, असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले. उगे गावातील लोकांशी आमचे चांगले नाते आहे. या गावातील कोणत्या ना कोणत्या कामात आम्ही नेहमी योगदान देत आलेलो आहोत. पण आता बाहेरून आलेले काही जण त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे चिरेखाणीसारखे बेकायदेशीर व्यवसाय बंद पडल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा खडीच्या खाणींकडे वळवलेला आहे, असा दावा जेसन यांनी केला.









