सांगली / प्रतिनिधी
क्षयरोगाच्या संशयित रुग्णांची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळण्यासाठी क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. त्यासाठी क्षयरोगाची लक्षणे जाणविणाऱ्यांची तातडीने क्षयरोग चाचणी होणे आवश्यक आहे. तसेच चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात यावे. क्षयरोगांची संख्या निश्चित होण्यासाठी सर्वच स्तरातून माहिती संकलित व्हावी, यासाठी संबधित यंत्रणांनी समन्वयाने कामकाज करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जिल्हा क्षयरोग (टी.बी) फोरमची त्रैमासिक आढावा बैठक जिल्हाधिकारी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा पुरवठा अधिकारी अशिष बारकुळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, महापालिका क्षयरोग अधिकारी डॉ. रविंद्र ताटे, अन्न व औषध विभागाच्या सहायक आयुक्त सपना कुचेकर, जिल्हा माहिला व बालकल्याण अधिकारी सुवर्णा पवार आदि उपस्थित होते.
क्षयरोगाची तपासणी करण्यासाठी खासगी डॉक्टरांच्याकडे रुग्ण जातात. अशावेळी खासगी डॉक्टरांनी अशा क्षयरुग्णांची माहिती जिल्हा प्रशासनाला तात्काळ कळविणे आवश्यक आहे. त्याबाबत संबधित यंत्रणांनी आदेश निर्गमित करावेत, अशा सूचना देऊन जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, अन्न व औषध प्रशासन विभागाकडे दरमहा प्राप्त होणाऱ्या अहवालामध्ये जिल्ह्यातील सर्व मेडिकल स्टोअरमधून क्षयरोगाच्या उपचारासाठी औषधे खरेदी केलेल्या खरेदीदारांची माहिती संकलित करण्यात यावी. सदरची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरी व ग्रामीण आरोग्य विभागाला उपलब्ध करुन द्यावी. तसेच जिल्ह्यातील डायग्नोस्टिक सेंटर, एक्सरे सेंटर, रेडिओलॉजिस्ट व फिजिशियन असोशिएशन यांनी त्यांच्याकडे चाचण्या करण्यासाठी किंवा उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला तातडीने कळवावी. यामुळे जिल्ह्यातील क्षयरोग रुग्णांची माहिती, संख्या संकलित करणे व निश्चित करणे सोईचे होईल. सदरची माहिती प्राप्त होताच त्यानूसार त्यांच्यावर उपचार करणे सोईचे होईल, असे सांगून चौधरी यांनी जिल्ह्यातील कोमॉर्बिड रुग्णांची माहिती संकलित करावी, असे आदेश दिले.
जिल्ह्यामध्ये क्षयरोग तपासणीची इस्लामपूर, सांगली सिव्हील हॉस्पीटल, मिरज सिव्हील हॉस्पिटल येथे सोय असून प्रतिदिन 60 ते 65 चाचण्या केल्या जातात. गतवर्षी 14 हजार क्षयरोग चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 3 हजार 550 इतके संशयित रुग्ण आढळून आले असून 2 हजार 510 इतक्या रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले. त्याचबरोबर क्षयरोगासाठी असलेल्या निक्षय पोषण योजनेंतर्गत 2 हजार 435 पात्र लाभार्थ्यांपैकी 1 हजार 340 पात्र लाभार्थ्यांना आर्थिक स्वरुपात मदत देण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांनाही तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, असे आदेशही जिल्हाधिकारी चौधरी यांनी यावेळी दिले. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकुर यांनी यावेळी क्षयरोगाच्या विविध योजनांचे सादरीकरण केले.