‘डॉक्टर्स डिरेक्टरी इंडिया’ आणि ‘द क्लाऊड फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 28 जुलै रोजी मुंबईतील राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्य सन्मान’ या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळय़ाचे यंदाचे तिसरे पुष्प. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे उल्लेखनीय कार्य समाजापुढे आणून समाज व वैद्यकीय व्यावसायिक यांच्यातील वाढता असंतोष कमी करणे हा या उपक्रमामागील मूळ उद्देश.
तसे पाहिले तर आजकालच्या पुरस्कारांमध्ये बाजारू पुरस्कारांचाच जास्त सुळसुळाट झाला असल्याचे दिसते. त्यामुळे ‘आरोग्य सन्मान’ या पुरस्काराची प्रति÷ा जपणे हे आमच्यासाठी एक आव्हान होते. आम्ही पुरस्कारार्थी निवडताना किती पारदर्शकता ठेवली आहे, ते आम्ही तयार केलेल्या तज्ञ ज्युरींच्या समितीवरून लक्षात येते. त्यांनी एकमताने निवडलेल्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो. पुरस्कारार्थीची वैद्यकीय सेवेतील कारकीर्द, त्यांचे वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदान यांचाही विचार करून महाराष्ट्रातून योग्य व्यक्तींची निवड केली जाते. आम्हाला या सर्व सन्मानार्थींचे अफाट असे सामाजिक व वैद्यकीय कार्य, ते करत असताना त्यांना आलेल्या अडचणी, त्यातून त्यांनी काढलेला मार्ग, ते प्रसार माध्यमांपासून लांब राहून करत असलेले कार्य, त्यांचा वैद्यकीय क्षेत्रात असलेला दृष्टिकोन, अनुभव आणि त्यांची कार्ये, यातून बरेच काही शिकायला मिळाले. अशा निवडक सन्मानार्थींचा सन्मानही यथायोग्य प्रकारे होण्यासाठी मग आमचीही धावपळ चालू असते.
आम्ही क्लाऊड फाउंडेशनच्या इतर उपक्रमाबरोबर अशा निवडक डॉक्टरांचे कार्य समाजापुढे आणायचे ठरवले परंतु आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींना एवढय़ा मोठय़ा सोहळय़ाचे आयोजन करणे एक अतिशय अवघड गोष्ट होती, परंतु एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की कुठलेही कठीण कार्य अगदी सोपे होऊन जाते. तसेच असेही म्हटले जाते की कोणतेही कार्य शुद्ध हेतूने केले असता त्यात यश मिळतेच. खूप अडचणी आल्या. मन खच्चीकरण करणारे प्रसंगही आले परंतु असे असले तरी बरीच चांगली माणसेही भेटली, बऱयाच जणांचे मार्गदर्शनही लाभले. यावेळी स्वतः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आमच्या कार्याची दखल घेत राजभवनात या सोहळय़ाचे आयोजन करावयास दिलेली परवानगी. असे अनेक प्रसंग डोळय़ासमोर उभे राहतात.
यावषी हा पुरस्कार सोहळा राजभवनात आयोजित करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. सर्व कार्यक्रमाचे आयोजन कसे करण्यात येईल, आवश्यक सूचनांचे पालन कसे करायचे याचा मिनिटा मिनिटाचा कार्यक्रम असणारे लिखित स्वरूपातील पत्रक आमच्या संस्थेला देण्यात आले. संस्थेकडूनही त्यांना हवा असलेला मजकूर मागवण्यात आला. कार्यक्रमाची वेळ, तारीख नक्की झाली. सन्मानार्थींनाही मग आम्ही तसे कळवले. कोरोना काळ असल्याने संख्येचे बंधन होते व कोरोना काळात दुसऱया शहरात जाऊन कार्यक्रम यशस्वी करणे हे आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होते.
मुंबईच्या राजभवनातील सगळी व्यवस्था अगदी चोख होती. बाहेरच्या गेटपाशी असलेले पोलिस ते आतील सफाई कामगारांपर्यंत सर्वच जण अतिशय अदबीने आपापले काम करत होते. दारातील गालीचा ते स्टेजवरील सर्व सजावट सर्वच आम्ही राजभवनात पोचायच्या अगोदर तयार होती. त्यातूनच आम्हाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कसे नियोजन करायचे याचे प्रात्यक्षिकासह धडे मिळाले. सगळे सन्मानार्थी दिलेल्या वेळेनुसार राजभवनात आले. राज्यपालांच्या आगमनापूर्वी सन्मानार्थींच्या चहापानाची उत्तम सोय करण्यात आली होती. अशा या सुंदर वास्तुत राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्रातील रीयल हीरोंना सन्मानित करण्याचे भाग्य आम्हाला लाभले, यापेक्षा मोठा आनंद तो काय?
यावेळी 1. डॉ. डी. जे. आरवाडे, सांगली, जीवन गौरव पुरस्कार, मॉडर्न मेडिसिन. 2. वैद्य गोपाळकृष्ण अंदनकर, चंद्रपूर, जीवन गौरव पुरस्कार, आयुर्वेद 3. डॉ. राजाराम जगताप, सातारा, जीवन गौरव पुरस्कार, होमिओपॅथी 4. डॉ. राजीव बोरले, जीवन गौरव पुरस्कार, दंत वैद्यक शास्त्र 5. डॉ. अजित दामले, पुणे, हिपॉपेट्स पुरस्कार, मॉडर्न मेडिसिन 6. वैद्य विनय वेलणकर, डोंबिवली, धन्वंतरी पुरस्कार, आयुर्वेद 7. डॉ. अरुण जाधव, पुणे, सॅम्युअल हनिमन पुरस्कार, होमिओपॅथी 8. डॉ. अनिश नवरे, ठाणे डॉ. रफिउद्दीन अहमद, पुरस्कार, दंत वैद्यक शास्त्र 9. श्रीमती इंदुमती थोरात, औरंगाबाद, फ्लॉरेन्स नाईटिंगल पुरस्कार, नर्सिंग. 10. डॉ. यशवंत आमडेकर, मुंबई, विशेषज्ञ पुरस्कार, बालरोग तज्ञ 11. डॉ. रवींद्र शिसवे, पुणे सनदी अधिकारी, डॉक्टर पुरस्कार, पोलीस प्रशासन यांना मा. राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आले.
विशेष नमूद करायचे म्हणजे जेव्हा सातारा जिल्हय़ातील 107 वषीय होमिओपॅथिक तज्ञ डॉ. राजाराम जगताप यांना सन्मानित करण्यात आले तेव्हा मात्र मनोमन खात्री झाली की आजकाल मिळणाऱया बाजारू पुरस्कारांमध्ये स्वतःची वैशि÷s जपत ‘आरोग्य सन्मान’ची वाटचाल योग्य मार्गाने चालू आहे.
सर्व सन्मानार्थींचे सत्कार झाल्यानंतर मा. राज्यपालांनी उत्स्फूर्तपणे केलेले भाषण कार्यक्रमाची शोभा शतगुणित करणारे होते. सर्व पॅथींनी एकत्रित आले पाहिजे हे सांगताना मा. राज्यपाल म्हणाले की, रामायणात उल्लेख असलेल्या वैद्य सुषेण यांच्यापासून भारताला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांची थोर परंपरा लाभली असून देशातील जुने अनुभवसिद्ध वैद्यकीय ज्ञान पारखून नव्याने पुढे आणले पाहिजे. प्रत्येकाने रोज योगसाधना करून आपले आरोग्य जपले पाहिजे, आपले वैद्यकीय ज्ञान जरी प्रगत असलेतरी कोणतीतरी अनामिक शक्ती जगात आहे याचा विसर पडता कामा नये. त्यासाठी आपण सर्वांनी आपली आध्यात्मिक प्रगती करण्यासाठीही तितकेच प्रयत्नशील असले पाहिजे त्यासाठी आपले विचार व आचरण शुद्ध असले पाहिजे असा मोलाचा सल्लाही राज्यपालांनी दिला.
आपल्या भाषणाची सांगता करताना आमच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. हे सुखद असणारे क्लाऊड फाऊंडेशनचे क्लाऊड लवकरच राजभवनापासून राष्ट्रपती भवनापर्यंत जावो असा आशीर्वाद दिला असता आम्हा क्लाउड फाऊंडेशनच्या सदस्यांच्या डोळय़ात आनंदाश्रू आले हे वेगळे सांगायला नको.
डॉ. शुभदा गिरीश कामत, पुणे








