साळगाव येथील मूर्तिकार प्रवीण मेस्त्राr यांनी केला वेळेचा सदुपयोग
प्रतिनिधी / कुडाळ:
कोरोनामुळे गावी आलेल्या तरुणाला शाळेत क्वारंटाईन व्हावे लागले. पण त्याच्यातील कलाकार त्याला स्वस्थ बसू देईना. क्वारंटाईन असतानाच शाळेत बसूनच गणेश मूर्ती साकारण्याचे काम साळगाव-मेस्त्राrवाडी येथील प्रवीण शांताराम मेस्त्राr (33) यांनी आपल्या साळगाव शाळा नंबर एकमध्ये केले. तसेच शाळा परिसर स्वच्छता व शाळेतील अन्य कामेही प्रवीण व त्याचा सहकारी वैभव सुरेश मेस्त्राr यांनी चांगल्या पद्धतीने केली.
आजोबा, वडील यांच्याकडून परंपरागत गणेशमूर्ती बनविण्याची कला आपल्याकडे आली. आता आपण व दोन भाऊ ती जपत आहोत. दरवर्षी कला जपण्यासाठी मुंबईतून खास गावी येऊन-जाऊन करत चार-पाच गणपती आपण करतो, असे प्रवीण यांनी सांगितले.
प्रवीण सांगतात, 14 जुलैला मी व माझ्या वहिनीचा भाऊ वैभव मेस्त्राr (रा. साळगाव) हे दोघे गावी आलो. गणेशमूर्ती बनविणे हा एकच ध्यास होता. गावी आल्यावर शाळा क्र. 1 मध्ये क्वारंटाईन झालो. घरी क्वारंटाईन राहून गणपती बनविण्याची इच्छा होती. पण ते नियमामुळे शक्य झाले नाही. माझ्यापूर्वी माझा भाऊ उमेश मेस्त्राrही क्वारंटाईन राहून घरी गेला होता.
शाळा परिसर सफाई, पाणी, लाईट, फॅन आदी कामेही मेस्त्राr बंधूंनी केली. गणपती करण्यासाठी घरी आलो मग 14 दिवस शाळेत शांत कसा बसू, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी ही इच्छा सरपंच उमेश धुरी, शालेय समितीचे अध्यक्ष विजय परब व शिक्षकांकडे बोलून दाखविली. त्यांनी त्यांना मूर्ती करण्यास परवानगी देतानाच शासनाचे नियम पाळून हे करावे लागेल, असे सांगितले.
अन् शाडू माती व साहित्य शाळेकडे आले
प्रवीण सांगतात, परवानगी मिळाल्यावर रिक्षाचालक धुरी यांना निरोप देऊन शाडू माती व साहित्य घराकडून आणून देण्यास सांगितले. त्यानंतर गणेशमूर्ती तयार करण्याचे काम हाती घेतले. गणेशमूर्ती तयार झाली आहे.
घरी गेल्यावर आणखी चार-पाच गणपती करणार आहे, असे प्रवीण यांनी सांगितले. त्यांनी आयटीआय केले असून माजगाव डॉकमध्ये टेक्नीशियन म्हणून ते 12 वर्षे काम करतात. डोंबिवलीत कुटुंबियांसह ते राहतात. क्वारंटाईन कालावधीत प्राथमिक शाळेत गणपती करण्याची संधी मिळाली हे मी भाग्य समजतो, असे ते म्हणाले. गावकमिटी बरोबर शिक्षिका सौ. सायली सामंत, श्रीमती पेडणेकर यांचे सहकार्य लाभले, असे त्यांनी सांगितले.









