पूर्वसूचना न देता कमी करण्यात आल्याने काम बंद आंदोलन : अखेर आयुक्तांनी काढला तोडगा
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या वाहन ताफ्यात विविध वाहने आहेत. पण आठ क्लिनरना अचानकपणे कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे हंगामी तत्त्वावर काम करणाऱया चालक आणि क्लिनरनी कामबंद आंदोलन छेडून मनपा आयुक्तांकडे तक्रार केली. अखेर वाहनांची संख्या वाढल्याने क्लिनरची तरतूद निविदेत करून सर्वांना सेवेत घेण्याची सूचना आयुक्त जगदीश के. एच. यांनी केली.
महापालिका कार्यालयातील कायमस्वरुपी वाहनचालक निवृत्त झाल्याने वाहन चालक आणि कचरा वाहतूक करणाऱया वाहनांवर क्लिनर कंत्राट पद्धतीने घेण्यात आले आहेत. मनपाच्या वाहन ताफ्यात कचरावाहू वाहने, जेसीबी, पाण्याचा टँकर, कॉम्पॅक्टर, जेट सकिंग मशीन आणि टिप्पर, शववाहिका अशी विविध 34 वाहने आहेत. सदर वाहने चालविण्यासाठी चालक आणि कचरावाहू वाहनांवर 23 क्लिनर कंत्राट पद्धतीने घेण्यात आले होते. यापूर्वी काढण्यात आलेल्या निविदेची मुदत संपल्यानंतर नव्याने निविदा काढून चालक आणि क्लिनरची नियुक्ती करण्यात आली आहे. पण सध्या जुन्या वाहन चालक आणि क्लिनरची नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र, निविदा काढताना 23 ऐवजी केवळ 15 क्लिनरची नियुक्ती करण्यात आली असून उर्वरित 8 क्लिनरना कोणतीच पूर्वसूचना न देता दि. 1 नोव्हेंबरपासून कामावरून अचानकपणे कमी करण्यात आले. निविदेप्रमाणे क्लिनर घेण्यात आल्याचे सांगून कंत्राटदाराने जबाबदारी झटकली. पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याने संतापलेल्या चालक आणि क्लिनरनी कामबंद आंदोलन छेडून महापालिका मुख्य कार्यालयात धाव घेतली.
महापालिका नोकर संघटनेचे पदाधिकारी अर्जुन देमट्टी यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांची भेट घेऊन तक्रार केली. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी वाहन विभागाच्या अधिकाऱयांना बोलावून सविस्तर माहिती जाणून घेतली असता ऑडिट विभागाच्या सूचनेनुसार केवळ 15 क्लिनर नियुक्तीकरिता निविदा मागविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कोणत्याही कामगाराला अचानक कमी करता येत नाही. प्रत्येक वाहनावर चालक व क्लिनरची गरज आहे. त्याकरिता सर्व कामगारांना कामावर घेण्याची सूचना केली. याबाबत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींचे निवारण करण्याची सूचना मनपा अधिकाऱयांना आयुक्त जगदीश के. एच. यांनी केली. त्यामुळे चालक व क्लिनरनी कामकाज सुरू केले.









