कॅन्टोन्मेंट बोर्डचा आंधळा कारभार : अंधाराच्या साम्राज्यामुळे नागरिकांची गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
विश्वेश्वरय्या चौक ते अरगन तलाव चौकपर्यंतच्या रस्त्यावर पथदीप सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र, सदर सुविधा कुचकामी बनली असून या मार्गावरील पथदीप दिवसा सुरू आणि रात्री बंद ठेवण्यात येत आहेत. दिव्यांच्या दुरुस्तीकडे कॅन्टोन्मेंट बोर्डचे साफ दुर्लक्ष झाले असल्याने वाहनधारकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
शहराचा मध्यवर्ती भाग महापालिकेच्या व्याप्तीत येतो. पण सभोवतालचा भाग कॅन्टोन्मेंटच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने अनेक समस्या जैसे थे आहेत. क्लब रोड म्हणून ओळख असलेला रस्ता राज्य महामार्ग असून रायचूर-वेंगुर्ला रोड म्हणून सरकारदप्तरी नोंद आहे. मात्र, हा भाग कॅन्टोन्मेंट बोर्डच्या व्याप्तीत येतो. कॅन्टोन्मेंट हद्दीतील राज्यमार्गाचा विकास सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आला आहे. लाखो रुपये निधी खर्ची घालून या ठिकाणी दुभाजक व पथदीप बसविण्यात आले आहेत. मात्र, सध्या पथदिपांच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱयांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. विश्वेश्वरय्यानगर ते अरगन तलावपर्यंतच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने 35 पथदीप उभारण्यात आले असून रस्त्याच्या दुतर्फा 70 दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, दिव्यांची देखभाल केली जात नसल्याने निम्मे दिवे सध्या बंद आहेत. त्याचप्रमाणे अरगन तलाव ते सीपीएड मैदानापर्यंतचे पथदीप रात्री बंद आणि दिवसा सुरू असा प्रकार सुरू आहे. परिणामी नागरिक आणि वाहनधारकांना अंधारामधून ये-जा करावी लागत आहे. पथदीप दिवसा सुरू ठेवण्यात येत असल्याने याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱयांकडे तक्रार करण्यात आली होती. युनिअन जिमखाना ते अरगन तलावपर्यंतचे पथदीप बंद असल्याने दुरुस्ती करण्याची तक्रार करण्यात आली होती. पण अद्यापही याची दखल घेण्यात आली नाही. रात्री पथदीप बंद आणि दिवसा सुरू असल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या परिसरात मैदान आणि खुली जागा असल्याने रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱयासाठी धोकादायक आहे. यामुळे रस्त्यावरील पथदीप सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे. पण याकडे दुर्लक्ष झाले असल्याने पथदीप असूनही परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. येथील पथदिपांची दुरुस्ती करण्याकडे कॅन्टोन्मेंट बोर्ड लक्ष देई&ल का, असा मुद्दा नागरिक उपस्थित करीत आहेत.