वृत्तसंस्था/ चेन्नाई
क्रोएशियाचा टेनिसपटू कोरिक याला कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी बल्गेरियाचा टेनिसपटू डिमिट्रोव्ह याची कोरोना चांचणी घेतली असताना त्याला याची लागण झाली होती.
झेदारमध्ये ऍड्रिया टूरवरील क्रोएशियन टप्प्यातील टेनिस स्पर्धेत डिमिट्रोव्ह आणि कोरिक हे सहभागी झाले होते. कोरिकने सोमवारी आपल्या ट्विटरवर स्वत:ला कोरोनाची बाधा झाल्याचे घोषित केले आहे. गेल्या काही दिवसापासून माझ्याशी संपर्कात असलेल्या व्यक्तींना ही बातमी कळावी यासाठी आपण आपल्या ट्विटरवर सदर माहिती कळवित आहे, असेही कोरिकने सांगितले. कोरोनाची लागण होण्यापूर्वी माझ्या प्रकृतीत कोणताही बिघाड झाल्याचे जाणवले नाही. त्याचप्रमाणे या रोगाची कोणतीच लक्षणे मला जाणवली नाहीत, असा खुलासा कोरिकने केला आहे. बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हने आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त रविवारी रात्री प्रसिद्ध केले होते. कोरिक आणि डिमिट्रोव्ह यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार चालू आहेत.









