नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
अभिनेत्री क्रीति सेनॉन सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’वरुन चर्चेत आहे. या चित्रपटात ती सीतामातेच्या भूमिकेत दिसून येणार आहे. क्रीतिच्या दुसऱया एका चित्रपटासंबंधी माहिती समोर आली आहे. क्रीति लवकरच शाहिद कपूरसोबत एका चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप घोषित झालेले नाही, परंतु याचे चित्रिकरण पूर्ण झाले असून त्याचे एक पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना बॉलिवूडमधील एक नवीन जोडी मोठय़ा पडद्यावर पाहता येणार आहे.

क्रीतिने सोशल मीडियावर नव्या चित्रपटाचे पोस्टर केले आहे. या पोस्टरमध्ये क्रीति अन् शाहिद कपूर बाइकवर परस्परांच्या दिशेने चेरा करून बसल्याचे दिसून येते. ‘आमच्या एका अशक्य वाटणाऱया प्रेमकथेचा रॅप अप झाला. आमच्या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही, परंतु हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कहाणी अमित जोशी अन् आराधना शाह यांनी लिहिली असून त्यांनीच याचे दिग्दर्शन केले आहे. दिनेश विजन, ज्योती पांडे अन् लक्ष्मण उतेकर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत’ असे क्रीतिने सोशल मीडियावर नमूद केले आहे.
शाहिद कपूर याचबरोबर अली अब्बास जफरचा ऍक्शन चित्रपट ‘ब्लडी डॅडी’मध्ये दिसून येणार आहे. अलिकडेच शाहिद हा विजय सेतुपतिसोबत ‘फर्जी’ या वेबसीरिजमध्ये दिसून आला होता. तर क्रीति सेनॉनचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास तसेच सैफ अली खान हे कलाकार दिसून येणार आहेत.









