देखभालीसाठी मागविल्या निविदा : झाडे-झुडपे वाढल्याने दुरवस्था

प्रतिनिधी /बेळगाव
अशोकनगर येथील जागेत 100 कोटी अनुदानांतर्गत क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली आहे. पण सदर क्रीडा संकुल क्रीडाप्रेमींसाठी खुले नसल्याने मैदानात व परिसरात झाडे-झुडुपे वाढली आहेत. याबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध केल्याने क्रीडा संकुलाच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच क्रीडा संकुल खुले करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या खुल्या जागेत विविध क्रीडापटुंसाठी सराव करण्याकरिता क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली आहे. बॅडमिंटन हॉल, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, क्रिकेट मैदान तसेच महिलांसाठी विशेष उद्यानांची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे. सदर क्रीडा संकुलाची उभारणी करून चार वर्षे उलटली पण क्रीडाप्रेमींसाठी हे व्यापारी संकुल खुले करण्यात आले नाही. त्यामुळे संकुलाच्या परिसरात झाडे-झुडुपे वाढली असून मैदानात गवत वाढले आहे. तसेच उद्यानाची दुरवस्था झाली आहे.
क्रीडा संकुलाच्या देखभालीसह विविध उपक्रम चालविण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. पण निविदेला प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे क्रीडा संकुलाला टाळे ठोकण्यात आले असल्याने वापराविना पडून आहे. क्रीडा संकुलाच्या उभारणी कोटय़वधी निधी खर्च करूनही वापर होत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर क्रीडा संकुलाचा वापर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. झालेल्या दुरवस्थेकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन क्रीडा संकुल चालविण्याकरिता निविदा काढण्यात आल्या आहेत. तसेच स्वच्छतेचे काम सुरू आहे. कंत्राटदार मिळाल्यास व्यापारी संकुल खुले होणार आहे.









