एप्रिलपासून मेपर्यंतची सर्व शिबिरे रद्द
पुणे / प्रतिनिधी
जगभरात कोरोनाचे संकट पसरले असून, देशातही सर्वच क्षेत्रे कोरोनामुळे प्रभावित झाली आहेत. त्याचा प्रभाव क्रीडा क्षेत्रावरही पडताना दिसून येत आहे. दरवषी एप्रिलपासून सुरू होणारी क्रीडा शिबिरे यंदा रद्द करण्यात आली आहेत.
जिल्हय़ात दरवषी एप्रिल महिन्यापासूनच विविध क्रीडा शिबिरांना प्रारंभ होतो. मेपर्यंत ती चालतात. या शिबिरांमध्ये हजारो खेळाडू सहभागी होऊन क्रीडा क्षेत्रात आपले कर्तृत्व दाखविण्यासाठी तयार होतात. परंतु, यंदा इतर क्षेत्राप्रमाणेच क्रीडा क्षेत्रालाही कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने एप्रिलपासून आयोजित केली जाणारी उन्हाळी क्रीडा शिबिरे रद्द करण्यात आली. त्याचा थेट परिणाम खेळाडूंवर पडणार आहे. खेळाडूंना प्रशिक्षण न मिळाल्याने त्यांच्या करिअरवरदेखील परिणाम होऊ शकतो.
मार्च महिन्यात जवळपास सर्वच शाळा बंद केल्या जातात. अभ्यासातून मुक्त झालेले विद्यार्थी क्रीडा प्रशिक्षणाकडे वळतात. एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱया आठवडय़ातच बुद्धीबळ, हॉकी, क्रिकेट, कुडो, हपकिडो बॉक्सिंग यासह अनेक क्रीडा शिबिरांना सुरुवात केली जाते. परंतु, यंदा कोरोनामुळे ही शिबिरे रद्द झाली आहेत.
आर्थिक नुकसानीमुळे प्रशिक्षकांमध्येही निराशा
एप्रिलमध्ये होत असलेल्या क्रीडा शिबिरांमध्ये मोठय़ा संख्येने खेळाडू सहभागी होत असतात. या शिबिरांच्या माध्यमावरच प्रशिक्षकांच्या कुटुंबाचा गाडा चालतो. परंतु, यंदा शिबिराचे आयोजन करणे शक्मय नसल्याने त्यांच्यावरही आर्थिक संकट ओढवले आहे, असे राईझिंग अकॅडमीचे संचालक श्रीकांत नेगी यांनी सांगितले.









