क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
क्रीडा संघटना, खेळाडू, संस्था यांना एकत्र आणून क्रीडाक्षेत्राला वाव देण्यासाठी क्रीडाभारती देशभर कार्यरत असून समाजामध्ये खेळाप्रती जनजागृती करून भारताला जागतिक स्तरावर अव्वल स्थानावर पोचविण्यासाठी कार्यरत आहे, असे प्रशंसोद्गार क्रीडाभारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री प्रसाद महानकर यांनी काढले.
सद्य परिस्थितीत खेळाडूंना प्रशिक्षक प्रोत्साहन देतात. पण, घरातून आई-वडिलांनी खेळाडूंना सहकार्य करणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि क्रीडाभारती याकरिता खेळाडूंच्या मातांचा वीरमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मान करते, नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंच्या मातांचा सत्कार क्रीडा भारतीतर्फे ऑलिम्पिकपूर्वीच केला होता, पदक जिंकल्यानंतर सर्व स्तरावर सत्कार करतात पण, क्रीडा भारती खेळाडू व त्यांच्या पालकांना प्रारंभापासूनच प्रोत्साहित करते, असे ते पुढे म्हणाले.
अनगोळ येथील संतमीरा शाळेच्या माधव सभागृहात क्रीडाभारती उत्तर कर्नाटका यांच्यावतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय क्रीडाभारती संघटनमंत्री प्रसाद महानकर, विद्या भारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, क्रीडाभारती उत्तर कर्नाटक अध्यक्ष मुकुंद किल्लेकर, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, संघाचे कार्यवाह की कृष्णानंद कामत, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती, ओंकार, भारतमाता फोटो पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले, परमेश्वर हेगडे यांनी प्रसाद महानकर यांचा विद्याभारतीतर्फे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ऋतुजा पवार, तसेच शरीरसौ÷व, क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल नगरसेवक आनंद चव्हाण, सारंग राघुचे, नितीन जाधव, राजू भातकांडे यांचा सत्कार प्रसाद महानकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यानंतर प्रसाद महानकर यांनी क्रीडाशिक्षकांना खेळाबद्दल जनजागृती करणेबाबत मार्गदर्शन केले, याप्रसंगी क्रीडाशिक्षक उमेश बेळगुंदकर, युवराज हुलजी, विवेक पाटील, जयसिंग धनाजी, नितीन नाईक, चंद्रकांत पाटील आर,पी, वटंगुडी, सचिन कुडची, प्रवीण पाटील, अर्जुन भेकणे ,रामलिंग परीट, एच बी पाटील, संजीव नाईक, मोहन पत्तार, ज्योती पवार,व डायनामिक स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश कुलकर्णी यांनी केले तर सुजाता दप्तरदार यांनी आभार मानले.









