वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीतर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या कसोटी मानांकनात फलंदाजांच्या विभागात भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपले अग्रस्थान शाबूत राखले आहे. तर उपकर्णधार अजिंक्मय रहाणेने आठव्या स्थानावर झेप घेतली आहे.
आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत विराट कोहली 928 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ 911 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. चेतेश्वर पुजाराने 791 गुणांसह सहावे स्थान मिळविले असून अजिंक्मय रहाणे 759 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. या मानांकन यादीत पहिल्या दहा फलंदाजांमध्ये भारताच्या तीन फलंदाजांचा समावेश आहे.
कसोटी गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताचा बुमराह 794 गुणांसह सहाव्या स्थानावर असून रविचंद्रन अश्विन आठव्या आणि मोहम्मद शमी दहाव्या स्थानावर आहे. कसोटी अष्टपैलूंच्या मानांकन यादीत रविंद्र जाडेजाने 438 गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे. लंकेच्या मॅथ्यूजने कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत पहिल्या 20 फलंदाजांमध्ये प्रवेश केला आहे. मॅथ्यूज सध्या सोळाव्या स्थानावर आहे. हरारे येथे झालेल्या पहिल्या कसोटीत लंकेने झिम्बाब्वेचा दहा गडय़ांनी पराभव केला. त्याचप्रमाणे पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या कसोटीत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा डावाने पराभव करत चार सामन्यांच्या या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.









